डोंबिवली: डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले दोन दिवसांपासून गायब झाल्याने रस्ते, पदपथ मोकळे झाले आहेत. त्यामुळे नेहमीच फेरीवाल्यांचा त्रास, गजबजाटाला कंटाळलेले प्रवासी, नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. रेल्वे स्थानक भागातील १५० मीटरच्या भागात फेरीवाले दिसले तर पथक प्रमुखांसह साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याचा इशारा आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिल्यापासून फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ऐन दिवाळी सणात रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करता येत नसल्याने फेरीवाल्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
हेही वाचा >>> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संजय घाडीगावकर यांचा जाहीर प्रवेश
दरवर्षी पालिका दिवाळी सणाच्या काळात पाच दिवस फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करण्यासाठी मुभा देत होती. ही पध्दत आयुक्त दांगडे यांनी मोडून काढून एकही फेरीवाला, टपरीवाला रेल्वे स्थानक भागात दिसणार नाही असा आक्रमक पवित्रा आयुक्तांनी घेतल्याने साहाय्यक आयुक्तांनी शांत राहणे पसंत केले आहे. बुधवारी रात्री डोंबिवली रेल्वे स्थानक भागाची पाहणी केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता आयुक्त दांगडे यांना रामनगर रेल्वे तिकीट खिडकी जवळ १५ हून अधिक फेरीवाले रस्ता अडवून व्यवसाय करत असल्याचे आढळले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी यापुढे अशाप्रकारे फेरीवाले रस्त्यावर दिसले तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जा, असा इशारा फेरीवाला हटाव पथकाला दिला. आयुक्त कधीही रेल्वे स्थानक भागात येतील. या भीतीने सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत साहाय्यक आयुक्त फेरीवाला हटाव पथकांसह आपल्या हद्दीतील रस्त्यांवर फेरीवाले व्यवसाय करणार नाही याची काळजी घेत आहेत.
हेही वाचा >>> दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील ‘या’ परिसरांत वाहतूक बदल
डोंबिवलीकर समाधानी
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर मागील सहा वर्षापासून फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्व भागात बुधवार पासून फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, पथक प्रमुख मुरारी जोशी, मिलिंद गायकवाड, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे सकाळी नऊ पासून कामगारांसह रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानक भागात तैनात असतात. कोणीही चोरून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे सामान जप्त केले जाते. फेरीवाल्यांकडून वस्तू घेण्याची सवय लागलेल्या डोंबिवलीकरांना आता सामान घेण्यासाठी दुकान, भाजी मंडईत जावे लागते. नागरिकांनी ही सवय अंगी लावून घ्यावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवायचा असेल तर आयुक्त दांगडे यांनी फ प्रभागातील कामगार अरुण जगताप यांची बदली करावी, अशी मागणी जागरुकांकडून केली जात आहे. जगताप यांचे बहुतांशी फेरीवाल्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते फेरीवाल्यांची पाठराखण करतात असे कर्मचारी सांगतात. जगताप यांची बदली झाली तर डोंबिवलीकरांची पूर्व भागातील फेरीवाल्यांच्या त्रासातून सुटका होईल, अशी पालिका वर्तुळात चर्चा आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेतली जात आहे. एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही याचे नियोजन केले आहे.
– दिनेश वाघचौरे, साहाय्यक आयुक्त फ प्रभाग