ठाणे : केंद्र शासनाने जुनी नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस पोर्टल) संकेतस्थळ बंद ठेवून ती अद्ययावत करत चार महिन्यांपुर्वी कार्यान्वित केली असली तरी या संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींमुळे ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी नागरिकांना महिनाभराची प्रतिक्षा करावी लागत आहे. नागरिकांना चकरा मारूनही दाखले मिळत नसून यामुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून ऑनलाईनद्वारे जन्म आणि मृत्युचे दाखले देण्यात येतात. त्यासाठी केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस पोर्टल) चा वापर करण्यात येत होता. गेल्या काही वर्षांपासून दाखले देण्याचे सुरळीतपणे सुरू असतानाच, केंद्र शासनाने या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी २० जून रोजी संकेतस्थळ बंद ठेवले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळ अद्ययावत करत ते कार्यान्वित करण्यात आले. या संकेतस्थळाच्या कामकाजासंबंधीचे प्रशिक्षण पालिकेतील जन्म आणि मृत्यु विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर नव्या प्रणालीद्वारे दाखले देण्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून त्यातील तांत्रिक अडचणींमुळे पालिका प्रशासनाला नागरिकांना जन्म, मृत्युचे दाखले ठराविक वेळेत देणे शक्य होत नाही. नागरिकांना दाखल्यासाठी चकरा माराव्या लागत असून यानंतही दाखले मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी नागरिकांना महिनाभराची प्रतिक्षा करावी लागत आहे. यातूनच पालिकेचे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा >>>नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान; जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाकडे

काय आहेत अडचणी

पुर्वीच्या संकेतस्थळामध्ये जन्म किंवा मृत्यु संबंधीची माहिती पालिकेचा कर्मचारी नोंदवायचा आणि त्यामध्ये काही बदल असल्यास ती तात्काळ दूरूस्त करायचा. यानंतर नागरिकांना काही वेळातच दाखले दिले जात होते. परंतु नव्या संकेतस्थळामध्ये जन्म किंवा मृत्युची माहिती नोंदविण्याबरोबरच त्यासंबंधीची कागदपत्रे स्कॅन करून जमा करावी लागतात. तसेच नोंदविल्या माहितीमध्ये किंवा अक्षरांमध्ये बदल करायचा असेल तर तो कर्मचाऱ्याला करता येत नाही. त्यासाठी त्याला केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे ई-मेल किंवा व्हाट्स ॲप ग्रुपद्वारे माहिती कळवून त्यात बदल करावा लागतो. याशिवाय, हे संकेतस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने त्यात माहिती नोंदविणे शक्य होत नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.