कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे, रस्ते समस्या आता मार्गी लागल्या पाहिजेत. प्रत्येक अभियंत्यांने जबाबदारीने आपल्या क्षेत्रात काम केले पाहिजे. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ठेकेदार काम करत नाही. त्याला आम्ही काही करू शकत नाही, अशी बेजबाबदार उत्तरे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सहकारी कनिष्ठ अभियंत्यांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यांवरील फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करा; आयुक्तांचे आदेश

तुम्ही मर्यादितच काम करत असाल तर कामाचे वेतनही तेवढेच मर्यादित घ्या, असे सांगायलाही शहर अभियंता अहिरे विसरले नाहीत. मागील साडे तीन वर्षाच्या काळात माजी शहर अभियंता सपना कोळी यांचा अभियंता विभागावर कोणताही अंकुश नव्हता. पक्त दालनातून काम करण्याची तत्कालीन शहर अभियंता कोळी यांची कामाची पध्दत असल्याने प्रभाग पातळीवर काम करणारे अभियंतेही आपल्यावर कोणाचा वचक नसल्याने मनमानी करत होते. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आहोत, असे सांगून अनेक अभियंते दुपारनंतर आपल्या खासगी कामासाठी, भागादारीतील इमारत बांधकामाच्या ठिकाणी सेवा देत होते. त्याचा सर्वाधिक फटका गेल्या साडे तीन वर्षात पालिका हद्दीतील विकास कामांना बसला आहे. कोळी यांच्या काळातील ढिसाळ कामाच्या पध्दतीमुळे डोंबिवली, कल्याण शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्याचे चटके आता प्रवाशांना बसत आहेत.

हेही वाचा- ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी, रात्री कंटेनरमधून सांडले होते रासायनिक द्रव्य

साडे तीन वर्ष कडोंमपात काढल्यानंतर कोळी यांची बदली झाली. त्यांच्या जागी ठाणे पालिकेतील अतिरिक्त नगर अभियंता अहिरे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. आपण कोळी यांना जशी खोटी कारणे सांगून मनमानी करत होतो अशा भ्रमात असलेल्या प्रभाग, मुख्यालय स्तरावरील अभियंता वर्गाला अहिरे यांनी कामातील उदासिनतेबद्दल फैलावर घेण्यास सुरुवात केली आहे. खराब रस्ते, खड्डे हे अहिरे यांच्या समोरील मोठे आव्हान आहे. दिवाळीपूर्वी शहरातील प्रत्येक रस्ता सुस्थितीत झाला पाहिजे यासाठी शहर अभियंता अहिरे स्वता कामाला लागले आहेत. कामासाठी दर्जेदार डांबर, इतर साहित्य वापरले जाते की नाही हे तपासण्यासाठी शहर अभियंता अहिरे हे अचानक डांबरीकरणाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहेत.

हेही वाचा- ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात दुध बंदी; ‘या’मागण्यांसाठी दुध विक्रेत्यांचे शुक्रवारी दुध बंद आंदोलन

ई प्रभाग हद्दीत अनेक महिन्यांपासून मलनिस्सारणाचे काम रखडले आहे. परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. हे माहिती असुनही ते काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी अहिरे यांना दिली. त्यांनी तात्काळ या कामावरील देखरेख अभियंत्यांला कामाच्या ठिकाणी बोलावून हे काम का पूर्ण होत नाही. ठेकेदार ऐकत नाही हे बेजबाबदारपणाचे उत्तर यापुढे ऐकून घेतले जाणार नाही, अशी तंबी कनिष्ठ अभियंत्याला दिली.

हेही वाचा- डोंबिवली एमआयडीसीत रात्रीचे प्रदूषण वाढले; नागरिकांच्या तक्रारी, नाल्यात रसायन ओतणाऱ्यांविरुध्द गुन्हा

डोंबिवली पूर्वेतील ब्राम्हण सभे जवळून रस्ते सुस्थितीत करण्याचा कामाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकही अधिकारी, अभियंता कार्यक्रमस्थळी नव्हता. याविषयी शहर अभियंता अहिरे यांनी संबंधितांना संपर्क करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. शहर अभियंता अहिरे यांच्या या आक्रमकपणामुळे आतापर्यंत करू, बघू पध्दतीने काम करणाऱ्या अभियंत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोणी कामात किती चुका, निष्क्रियपणा केला तरी गेल्या साडे तीन वर्षात माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी एकाही अभियंता, कामात चुकारपणा करणाऱ्या ठेकेदाराला कधी काळ्यात यादीत टाकले नाही. या सर्व गोष्टी निदर्शनास आल्यानंतर शहर अभियंता अहिरे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City engineer arjun ahire anger on engineers who are lax in their work thane group dpj