कल्याण पश्चिमेतील वालधुनी नदीच्या काठी योगीधाम भागात ११२ कोटी खर्चू उभारण्यात येत असलेल्या सिटी पार्कला दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा फटका बसला. स्मार्ट सिटी प्रकल्प निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पुराचे पाणी पार्कमध्ये घुसल्याने आतील बांधकाम सामानाची नासधूस झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वालधुनी नदीच्या काठी २३ एकर जमिनीवर स्मार्ट सिटी प्रकल्पातून सिटी पार्क प्रकल्पाची कल्याण डोंबिवली पालिकेकडून उभारणी केली जात आहे. पालिका हद्दीतील रहिवाशांना शहरात मनोरंजन नगरी असावी या उद्देशातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

सर्व नद्या बुधवारपासून धोक्याची पातळी ओलंडून वाहत आहेत –

सिटी पार्क वालधुनी नदी काठी असल्याने नदी काठच्या भागात संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात स्मार्ट सिटी कंपनीने यापूर्वी सुमारे ६४ कोटी खर्च केले आहेत. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू, रायता, वालधुनी नद्यांना पूर आला आहे. उल्हास खोऱ्यात पावसाचा सर्वाधिक जोर आहे. हे पाणी समुद्राकडे जाण्यासाठी या नद्यांमधून वाहत येते. या सर्व नद्या बुधवारपासून धोक्याची पातळी ओलंडून वाहत आहेत.

या प्रकल्पाला गेल्या चार वर्षापासून पर्यावरणप्रेमी विरोध करत आहे –

कल्याण परिसरात पूर परिस्थिती असल्याने पुराचे पाणी योगीधाम भागात वालधुनी नदी काठी असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात घुसले. पुराचे पाणी प्रकल्पात येत असल्याचे समजताच प्रकल्पातील कामगारांनी तातडीने या भागातून बाहेर पडणे पसंत केले. पुराचे पाणी प्रकल्पात घुसल्याने बांधकाम साहित्याची नासधूस झाली आहे. वालधुनी नदी काठी बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला गेल्या चार वर्षापासून पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. नदीचा प्रवाह बुजवून प्रकल्पाचे काम सुरू आहे. वालधुनी नदीचा नैसर्गिक प्रवाह अरुंद केला तर पावसात ते पाणी माघारी येऊन नागरी वस्तीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिटी पार्क परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

ठाण्यात मागील २४ तासात ३२ वृक्ष उन्मळून पडले

सीटी पार्कमध्ये पुराचे पाणी आले असले तरी त्यामुळे प्रकल्पातील कोणत्याही वस्तुची नासधूस झालेली नाही. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे, असे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले.