कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर देयकांचा भरणा करता यावा म्हणून पालिका प्रशासनाने १ डिसेंबरपासून पालिकेची दहा प्रभाग हद्दीतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेसारखी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिका हद्दीतील बहुतांशी करदाता हा नोकरदार, व्यावसायिक आहे. त्यांना कामाच्या दिवशी पालिकेत येऊन मालमत्ता कर भरता येत नाही. त्यामुळे नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक करदात्यांचा विचार करून प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके मालमत्ता करधारकांना पालिकेकडून वितरित करण्यात आली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीची कराची रक्कम ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पालिकेत भरल्यास चार टक्के आणि ऑनलाईन भरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत कोपरमधील बेकायदा बांधकामावर कारवाई

ज्या मालमत्ता करधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. मालमत्ता कराच्या थकित रकमेवर दोन टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करणे, इमारत, चाळी, आस्थापनेला असलेल्या नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

एवढ्या कारवाया करूनही थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करत नसेल तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. विहित प्रक्रिया पार पाडून त्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. या दंडात्मक कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतपूर्व मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त

मालमत्ता कराच्या देयकावरील क्युआर कोड स्कॅन करून, पालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नागरिक मालमत्ता कर भरणा करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civic facilities centers of kalyan dombivli municipal corporation open even on holidays ssb