शाळेतील कवितांमधील नदीचे स्वरूप ऐकताना डोळ्यासमोर एक वेगळे चित्र निर्माण होते. परंतु आजची पिढी बुद्धीला जे दिसते तेच खरे मानणारी आहे. त्यामुळे त्यांना कवितेल्या नदीची व्याख्याही खोटी वाटते. त्यांच्या मते उल्हास नदीचे दिसणारे काळे-निळे पाणी हेच नदीचे पाणी असा समज रुजत चालला आहे. यासाठी प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया करून विद्यार्थ्यांसाठी नदीचे रूप बदलविण्यासाठी मदत करावी; जेणेकरून भावी पिढीला हे नैसर्गिक सौंदर्य पाहता व अनुभवता यावे, तसेच यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.
-छाया घाडगे, डोंबिवली
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर बंदी आणणे म्हणजे तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या पोटावर पाय देण्यासारखे आहे. आम्ही डोंबिवलीतील प्रदूषणावर वारंवार पत्राद्बारे तक्रारी केल्या. परंतु काहीही परिणाम झाला नाही. येथील कंपन्या बंद करून प्रदूषण नियंत्रणात नक्कीच येईल, परंतु अनेक कामगार बेरोजगार होतील. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडात्मक कारवाई करावी.
-विश्वनाथ बिवलकर, डोंबिवली
डोंबिवलीसारख्या भरपूर लोकवस्ती असणाऱ्या शहरात प्रदूषणाने अक्षरश टोक गाठले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या विषारी वायूमुळे क्षयरोगासारखे आजार बळावत आहेत. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी तोंडाला मास्क लावणे तसेच हातात ग्लोज घालणे सक्तीचे आहे. सर्व प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जातेच, शिवाय कधी कधी ते जमिनीमध्ये मुरते. अशा निर्णयामुळे कारखानदारी धोक्यात आल्याचे चित्र रंगविले जात असले तरी र्सवकष विचार करता हा निर्णय योग्यच आहे.
-प्रियांका बुडकुले, डोंबिवली
गुरुवारी ‘लोकसत्ता ठाणे’ मधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचे वृत्त वाचले. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परिस्थिती सध्या ‘वरातीमागून घोडे’ अशी झाली आहे. डोंबिवली- अंबरनाथमधील कारखान्यावर बंदी आणून नागरिकांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण केला आहे. आजवर संथ कारभार असणाऱ्या या मंडळाने चक्क दहा कंपन्यांवर बंदी आणली. पुढेही कारवाई कराव्यात.
-विनोद देशमुख, ठाणे</strong>
डोंबिवली हे सगळ्यात जास्त प्रदूषणाचे शहर म्हणून गणले जाते. मध्यंतरी तर हिरव्या पावसाने खळबळ उडवली होती. याची सर्वत्र चर्चा झाली आणि पुढे मात्र विषय थंडावला. सर्व प्रदूषित रसायने हवेत तसेच पाण्यात सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतो. अनेक कारखाने शाळांच्या जवळ बांधलेले आहेत. कारखान्यांची वेळोवेळी यंत्रणा बदलणे आवश्यक आहे.
-किशोर सावंत, डोंबिवली
प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर केलेल्या कारवाईमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आजवर हे कारखाने बेकायदेशीरपणे पर्यावरणाला घातक असे काम करत होते. उल्हासनगर येथील असंख्य कारखाने नदीमध्ये अवैधरीत्या सांडपाणी सोडतात. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात डोकावत आहे. प्रदूषण करणारे हजारो असले तरी कारवाई मात्र बोटावर मोजता येईल एवढय़ाच कारखान्यांवर होते.
-मनोज खाबडे, ठाणे