रिक्षा आणि टीमटी बस व्यवस्थापनात सुसूत्रता नसल्याने रहिवाशांचे अतोनात हाल
मुंबई, ठाण्यातील बडय़ा बिल्डरांचे मोठे गृहप्रकल्प, विशेष नागरी वसाहतींमधून डोके वर काढून उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती आणि कोटय़वधी रुपये मोजून या ठिकाणी राहावयास आलेल्या रहिवाशांच्या वाढत्या संख्येमुळे घोडबंदर मार्गाला सध्या नवे ठाणे असे संबोधले जाऊ लागले आहे. या नव्या ठाण्यापासून मूळ शहरापर्यंत किंवा रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी ठोस अशी वाहतूक व्यवस्थाच गेल्या काही वर्षांत उभी राहू शकलेली नाही. स्थानकापासून घोडबंदपर्यंत हव्या त्या ठिकाणी रिक्षाचालक थेट प्रवासाची हमी देत नाहीत, टीएमटीची व्यवस्थेवर विसंबून राहता येत नाही, अशा अडचणीत सापडलेल्या या भागातील रहिवाशांनी सार्वजनिक वाहतुकीच्या बेकायदा बस व्यवस्थेला आपलेसे केले आहे. ठाणे वाहतूक पोलीस मध्येच कधी तरी जागे होतात आणि या बसगाडय़ा एकामागोमाग एक बंद करतात. या धरसोड कारभारात घोडबंदरवासी मात्र नाहक भरडले जातात.ठाणे स्थानकापासून घोडबंदर मार्गाकडे एका दमात जाण्यास रिक्षाचालक फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे स्थानकातून कापुरबावडी नाक्यापर्यंत किंवा मानपाडा रोड, काशिनाथ घाणेकर चौकापर्यंत यायचे आणि पुन्हा दुसरी रिक्षा पकडून इच्छितस्थळी निघायचे असा द्राविडी प्राणायाम प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे प्रवासी वळतो तो शेअर रिक्षांकडे. मात्र, या महत्त्वाच्या मार्गावर शेअर रिक्षांचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या काही शेअर रिक्षा या भागातून धावतात एक तर त्या पवारनगर किंवा हिरानंदानी मेडोस म्हणजेच घाणेकर चौक येथे थांबतात. त्यानंतर प्रवास करायचा झाल्यास येथील चाकरमानी पुन्हा वेगळी रिक्षा करतात. या ठिकाणाहून टिकुजिनीवाडी किंवा कासारवडवली, पातलीपाडा, काजुपाडा अशा ठिकाणी जाण्यास येथे शेअर रिक्षा नाहीत. त्यामुळे मीटरची रिक्षा हाच एकमेव पर्याय आहे.
घाणेकर किंवा हिरानंदानी मेडोस चौक
घाणेकर चौकामध्ये शेअर रिक्षा थांबतात. मात्र तीन प्रवासी आल्यानंतरही रिक्षाचालकांना चौथ्या प्रवाशाची प्रतीक्षा असते. त्यामुळे घाईच्या वेळी कार्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. तर काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रात्रीचे नाटक संपल्यानंतरही हे रिक्षावाले आसपासच्या परिसरात जाण्यासाठी नकार देतात. पैसे देऊनही हे रिक्षाचालक इच्छितस्थळी येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
मानपाडा नाका
या ठिकाणी असलेल्या मोठय़ा सोसायटीतील तीन नागरिकांनी एकत्र येऊ न मीटर रिक्षा पकडली आणि पैसे शेअर केले तरीही या रिक्षावाल्यांना चालत नाही. मीटरने भाडे घेण्यास रिक्षाचालक नकार देतात.