ठाणे – आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात साहित्यभूषण राम गणेश गडकरी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच, ठाण्यात अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था (सीकेपी) यांच्या वतीने मंगळवारी ठाणे शासकीय विश्राम गृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी या समाजातील नागरिकांनी हातात फलक घेऊन अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध केला तसेच अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या आणि मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती चे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून आमदार अमोल मिटकरी यांना समज द्यावी, तसेच त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाने केली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर, यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात तसेच तालुकास्तरावर निदर्शने केले जातील, असा इशारा याप्रसंगी समीर गुप्ते यांनी दिला. या आंदोलनात मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते जेष्ठ पत्रकार तुषार राजे, रामानंद सुळे अतुल फणसे, गिरीश राजे विकास देशमुख , जयदीप कोरडे, राजीव प्रधान , विनय चौबळ, शिरीष गडकरी ,दीपक फणसे,नागेश कुळकर्णी, यशवंत रणदिवे,चंद्रशेखर देशपांडे,किशोर राजे , नितीन वैद्य, प्रकाश दिघे,तेजस राजे, राधिका गुप्ते योगिनी चौबळ, पूजा सुळे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.