क्लारा कोरिया , प्रतिनिधी, वनशक्ती
अर्निबध शहरीकरणाने नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते. मुंबईच्या परिघात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांना गटारांची अवकळा प्राप्त झाली. घनगर्द सावली देऊन हवेतला गारवा कायम ठेवणारी झाडे विकास योजनांच्या नावाखाली तोडण्यात आली. दुसरीकडे झाडे लावण्याच्या अटींवर अनेकदा स्थानिक प्राधिकरणांमध्ये कार्यरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती झाडे तोडण्याची परवानगी देते. मात्र तोडण्यात आलेल्या या झाडांचे अशा प्रकारे पुनरेपण होते का हे कुणीही तपासून पाहत नाही. ठाणे महापालिकेनेही रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी १४०० झाडे तोडून ती अन्यत्र लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. यानिमित्ताने विकास की पर्यावरण रक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने गेली काही वर्षे सातत्याने ठाणे परिसरातील ढासळत्या पर्यावरणाचा प्रश्न मांडणाऱ्या ‘वनशक्ती संस्थेच्या’ प्रतिनिधी क्लारा कोरिया यांच्याशी साधलेला संवाद..
* विकासाच्या नावाखाली ठाणे शहरात झाडांची खुलेआम कत्तल होत आहे, याबद्दल आपले मत काय?
शहराचा विकास होण्यात कोणतीही पर्यावरण संस्था किंवा पर्यावरणप्रेमी विरोधात नाहीत. शहर सुनियोजित होण्यासाठी प्रशासकीयदृष्टय़ा विकासाकडे वाटचाल करावीच लागेल. मात्र हा विकास विचारपूर्वक व्हायला हवा. याबाबतीत प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. विकासाचा परिणाम शाश्वत असेल तरच शहरात सुव्यवस्था असेल. सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून विकास होत असताना विकासाशी संबंधित मापदंड निश्चित होणे गरजेचे आहे. या मापदंडाच्या आधारे विकास योजनांची आखणी करता येईल. दुर्दैवाने आपल्या देशात विकास करताना कोणत्याही मापदंडाचे पालन यंत्रणेकडून केले जात नाही. मोठमोठय़ा रस्त्यांवर पूल बांधण्याचे काम सुरु होते आणि शेवटाला रस्त्यावर असणारा सिमेंटचा ढीग महिनाभर तसाच राहतो. ठाणे शहराबाबत बोलायचे झाले तर ठाणे खाडीजवळ आजबाजूच्या परिसरात काही काम सुरूअसल्यास त्याचे सीमेंट तिथे पडून राहते. जे यथावकाश खाडीत जाते, किंवा टाकले जाते. त्याची नीट विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी खाडीलगत असणाऱ्या सूक्ष्मजीवांना धोका संभवतो. काम पूर्णत्वास नेण्याच्या नियमांचे पालन करायला हवे. ठाणे शहरात होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही बाबतीत पाठपुरावा केला जात नाही. शहरात असे निर्णय घेताना विचारविनिमय करणारा समूह असला पाहिजे. ज्यात पर्यावरणतज्ज्ञ, प्रशासकीय यंत्रणा, सामान्य नागरिकांचा समावेश असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी चर्चा होतात मात्र त्या केवळ दिखाव्यासाठी. त्यातून काहीच साध्य होताना दिसत नाही. प्रशासन याबाबतीत फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही.
* झाडे तोडल्यावर झाडांची पुनर्लागवड याकडे गांभीर्याने पाहिले जाते का?
झाडे तोडल्यावर त्यांची पुनर्लागवड या गोष्टीकडे ज्या गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे, तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. बेसुमार तोडलेल्या झाडांची पुनर्लागवड होत नाही. काही ठिकाणी होत असेल तर ती केवळ कागदोपत्री होते. शिवाय मोठे वृक्ष तोडतात आणि त्याची भरपाई म्हणून छोटे झुडूप लावून झाडांची पुनर्लागवड केल्याचा आव आणला जातो. विकासासाठी किती झाडे तोडली, त्यापैकी किती झाडांची पुनर्लागवड केली याचे मोजमाप करणारी ठोस यंत्रणा असायला हवी. कागदावर नोंद केलेली आणि प्रत्यक्षात पुनर्लागवड केलेली झाडे यात समतोल असायलाच हवा. एखादे झाड तोडताना त्याची सद्य:स्थिती, झाडामार्फत उपलब्ध होणारी सावली, मिळणारे ऑक्सिजन याचा सारासार विचार करता तोडलेले झाड पुन्हा त्या स्थितीत येण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लोटणार आहे. तोवर त्या परिसरातील या नैसर्गिक बाबींना आपण मुकणार आहोत. मात्र त्याचा विचार केला जात नाही. या सर्व बाबींचा विचार केला तर विरोध असण्याचे कारणच नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करून आपण कोणत्याही प्रकारे विकास साध्य करू शकणार नाही. आपल्याला शांघाय किंवा जपानप्रमाणे नको तर देशी तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा मेळ घालून विकास करावा लागेल.
* ठाण्यातील वृक्षतोडीचा परिणाम काय होऊ शकतो?
दिवसेंदिवस मुंबई आणि ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात या शहराला नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागेल. आपल्याला मोठे रस्ते हवे आहेत. राष्ट्रीय मार्ग हवे आहेत. एकंदरीतच शहराला सुनियोजित करणारा विकास हवा आहे. मात्र वृक्षतोड करून कोणता विकास आपण साधणार आहोत, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. विकासाची खरी व्याख्या शोधण्याची गरज आहे. ज्यात पर्यावरण आणि प्रशासकीय सुधारणा यांचा समतोल साधेल. तोच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास असेल. पर्यावरण विरोधी विकास योजनांचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य हा त्याचाच परिणाम आहे.
* विकासासाठी हरित ठाणे अशी शहराची ओळख पुसली जात आहे का?
ग्रीन ठाणे, क्लिन ठाणे हे केवळ घोषवाक्यापुरते मर्यादित राहिलेले आहे. ठाणे खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात खारफुटी आहे. घोडबंदरसारख्या ठिकाणी हिरवाई आहे. मात्र मोठमोठय़ा बांधकामासाठी ही हिरवाई नष्ट केली जात असेल तर हिरव्या ठाण्याची ओळख नक्कीच पुसली जात आहे.
* विकास आणि पर्यावरण यांचा दुवा साधणारा सुवर्णमध्य काय असू शकतो?
एवढय़ा मोठय़ा शहराचा विकास एकटय़ा यंत्रणेच्या माध्यमातून होणे शक्य नाही. यासाठी पर्यावरण संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा, सामान्य नागरिक यांनी एकत्रित येऊन काम केल्यास विकास शाश्वत ठरेल. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टी, विकास योजना राबविणाऱ्या यंत्रणा जेव्हा टाळतील, तेव्हाच आपण योग्य मार्गावर आहोत, असे म्हणता येईल. पर्यायी उपायांचा विचार जेव्हा होईल, तेव्हाच विकास आणि वृक्षतोड यांचा सुवर्णमध्य साधला जाईल. येऊर एन्व्हायर्मेटल सोसायटीच्या अंतर्गत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था एकत्र आल्या आहेत. जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहेत. शहरातही तसा प्रयत्न करायला हवा.