डोंबिवली- डोंबिवली जवळील २७ गावातील भोपर गावातील व्यायम शाळेत बुधवारी सकाळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांची जोरदार हमरीतुमरी झाली. राजकीय आणि पाणी प्रश्नावरुन ही वादावादी आणि त्यानंतर हाणामारीची घटना घडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात केल्या आहेत.
गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना समर्थन देण्यासाठी अधिक संख्येने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. व्यायम शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भोपर गाव हद्दीत नियमित वादावादीचे प्रसंग उद्भवत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
पोलिसांनी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ॲड. ब्रम्हा माळी हे भोपर मधील आपल्या व्यायमशाळेत बुधवारी सकाळी उपस्थित होते. त्यावेळी तेथे भाजपचे कार्यकर्ते कुंदन माळी आपल्या कार्यकर्त्यांसह आले. ब्रम्हा आणि कुंदन यांच्यात जुन्या राजकीय विषयावरुन बोलाचाली होऊन त्याचे रुपांतर हमरीतुमरी आणि ॲड. ब्रम्हा यांना मारहाण करण्यात झाले.
ॲड. ब्रम्हा माळी यांनी कुंदन माळी, नीलेश सावकार, विनेश माळी, मुकेश पाटील यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे कुंदन माळी यांनीही ॲड. ब्रम्हा आणि त्यांचे कार्यकर्ते रमेश पाटील, दिलखुष माळी, पांडुरंग पाटील यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही गटा विरुध्द परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही गटात रात्रीच्या वेळेत पुन्हा वादंग होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटातील आठ जणांना अटक केली. या वादावादीतून भोपरमधील राजकीय वातावरण तापले आहे.