अंबरनाथ : यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी आणि रेल्वे पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. रेल्वे रुळावरून प्रवाशांना हटवताना रेल्वे पोलीस आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. या झटापटीत काही प्रवाशांना मारहाण झाल्याचीही माहिती प्रवाशांनी दिली आहे. या प्रकारानंतर रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संघर्ष टोकाला गेल्याचे दिसून आले आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास सर्वच फलाट प्रवाशांनी अगदी खचून भरलेले असतात. लांबचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी जागा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. अशा वेळी फलाटावर येत असलेल्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी स्पर्धा असते. तर अंबरनाथ स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी काही प्रवासी थेट यार्डात जाऊन लोकलमध्ये प्रवेश करतात. याविरुद्ध फलटावर उभ्या राहणाऱ्या काही प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीसाठी यार्डातील लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवून कारवाई केली. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे रुळावर काही मिनिटे लोकल रोखून धरली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मार्ग मोकळा करत मंगळवारी ७ वाजून ५१ मिनिटांची लोकल मार्गस्थ केली. मात्र बुधवारी प्रवासी पुन्हा यार्डात याच ७ वाजून ५१ मिनिटांच्या लोकलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना रोखून त्यांना फलाटावर जाण्याचे सांगितले. प्रवाशांनी या गोष्टीला नकार देत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली.
हेही वाचा – घोडबंदर मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी
रुळावरून प्रवाशांना बाजूला काढत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या या भूमिकेवर प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे लोकलमध्ये फलटावरूनच प्रवेश करावा असे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितले आहे. यार्डात बसणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होत असल्यास उलटा प्रवास करून जागा अडवणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करावी, अशी मागणी आता रेल्वे प्रवाशांनी केली आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे दिसून आले आहे.