कल्याण– हाॅटेल बाहेर उभे असलेल्या महिलेला जवळ उभा असलेला तरुणांचा एक गट आपल्या विषयी काहीतरी संशयाने बोलत आहे असा संशय आला. या महिलेने या तरुणांना जाब विचारण्या बरोबर पती आणि पोलिसांना ही माहिती दिली. या घटनेनंतर या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी इराणी वस्तीमधील एक गट आंबिवलीत तरुणांच्या गटाला जाब विचारण्यासाठी गेला. या बाचाबाचीमधून दोन गटात मंगळवारी रात्री जोरदार राडा झाला.
खडकपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून १० जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फरार तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून हे प्रकरण मिटविण्यात आले होते. परंतु संध्याकाळच्या वेळेत इराणी वस्तीमधील एक गट आंबिवली गावात जाऊन तरुणांना जाब विचारू लागला. याचा राग आल्याने संतप्त झालेला तरुणांचा गट आणि इराणी वस्तीमधील गट यांच्या रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी पाहून पादचाऱ्यांची पळापळ झाली. काही रिक्षा या भागात रोखून धरण्यात आल्या होत्या.
पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद झीने आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वताहून गुन्हा दाखल करुन फरार तरुणांचा शोध सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.