ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. हे दोघेही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. परंतु वैयक्तिक वादातून ही हाणामारी झाली असून त्याचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मासुंदा तलाव येथील शिवसेना जिल्हा शाखा ते टेंभीनाका अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक बाजारपेठेतून जात असताना, मिरवणुकीत सामील झालेले सिद्धेश अभंगे आणि अजय पासी या दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अचानकपणे झालेल्या हाणामारीमुळे मिरवणुकीत सहभागी झालेले शिवसैनिक चक्रावले आणि त्यांच्यासह पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजुला केले.
हेही वाचा – कल्याण डोंबिवलीतील वृक्ष विद्युत रोषणाई मुक्त
सिद्धेश अभंगे आणि अजय पासी हे दोघेही युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. हे दोघे एकेकाळी जिगरी मित्र होते. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले असून ते आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. यामुळे वैयक्तिक वादातून ही हाणामारी झाली असून त्याचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.