डोंबिवली: इमारतीच्या बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागात रविवारी रात्री एका बांधकाम साहित्य पुरवठादाराला चार तरुणांनी मारहाण केली. चाकुने माने जवळ वार करुन गंभीर जखमी केले आहे. यामधील एक तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. यापुर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने एका गुन्ह्यात त्याला फरार म्हणून जाहीर केले आहे.
तोच फरार तरुण पुन्हा डोंबिवलीत हाणामारी करण्यासाठी आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण वाढू नये म्हणून सध्या बेकायदा बांधकामांमध्ये सक्रिय असलेला आयरेगाव भागातील एक भूमाफिया सक्रिय होता. गुन्हा दाखल होत असताना रामनगर पोलीस ठाण्यात तो तीन तास बसून होता, अशी माहिती विश्वसनीय सुत्राने दिली. वरुण शेट्टी, सचीन केणे, तुषार शिंदे, जितेश उर्फ बाबु पाटील (सर्व राहणार आयरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. निखील सुजीत पाटील (२७, रा. बालाजी गार्डन, आयरेगाव) असे तक्रारदार बांधकाम पुरवठादाराचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार निखील यांचा बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरुन निखील आणि वरुण शेट्टी, सचीन केणे यांच्यात बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन सतत वाद होत होते. हा राग आरोपी तरुणांच्या मनात होता. रविवारी रात्री निखील आपले काका प्रदीप पाटील यांच्या सोबत आयरे गाव पुलाजवळ बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी वरुण शेट्टी हा आपल्या बुलटे वाहनावरुन निखील बोलत होता त्या ठिकाणी आला. त्याने जुन्या भांडणाचा राग उकरून काढला. निखीलला शिवीगाळ आणि दमदाटी केली. ही बोलाचाली सुरू असताना वरुणचे मित्र सचीन केणे, तुषार शिंदे, जितेश पाटील घटनास्थळी आले. त्यांनी पण वरुणची बाजू घेऊन निखील यांना दमदाटी शिवीगाळ केली.
हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे तीन जण अटक
तुषारने मारहाणीसाठी लाकडी दांडके आणले होते. निखील वरुण यांच्यात भांडण सुरू असताना वरुणने जवळील चाकुने निखीलवर हल्ला करुन त्याच्या मानेजवळ गंभीर दुखापत केली, असे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी आयरेगाव भागात एका भूमाफियाने अशाचप्रकारे एका प्रकरणात हल्ला करुन पळ काढला होता. हा माफिया आता एका पोलिसाच्या बुलेटवर बसून डोंबिवली शहरात फिरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. माफिया, गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाक राहिला नसल्याने साहित्यिक सुसंस्कृत डोंबिवलीत गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा आहे.