एकीकडे महत्त्वाच्या थांब्यांवरही बसेस वेळेत येत नसल्याबद्दल प्रवाशांची बोंब सुरू असताना ठाणे शहरातील एका थांब्यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि बेस्ट या परिवहन उपक्रमांमध्ये जुंपली आहे. ठाणे ते बोरिवली अशी वातानुकूलित बससेवा सुरू करत ‘टीएमटीने’ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील कोपरी बसथांब्यावरून बस सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘एनएनएमटी’ आणि ‘बेस्ट’ उपक्रमानेही आपल्या वातानुकूलित गाडीचा मोर्चा या थांब्यावर वळवला आहे. त्यामुळे आपले प्रवासी कमी होण्याच्या भीतीने ‘टीएमटी’ प्रशासनाने इतर दोन्ही उपक्रमांना ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ असा सवाल विचारला आहे.
‘बेस्ट’ उपक्रमाने आधी ठाणे-बोरिवली मार्गावर वातानुकूलित सेवा सुरू केली. ‘बेस्ट’ला मिळणारा प्रतिसाद पाहून नवी मुंबई परिवहन उपक्रमानेही महापे ते बोरिवली अशी ‘एनएमएमटी’ वातानुकूलित सेवा सुरू केली. दुसरीकडे, आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमासाठीही ठाणे-बोरिवली हा मार्ग चांगलाच फायद्याचा ठरत आहे. या मार्गावर एका बसमागे प्रतिदिन १२ ते १४  हजार रुपयांचे उत्पन्न टीएमटीला मिळते.  
या मार्गावर असलेल्या कोपरी थांब्यावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे कोपरीवरील प्रवाशांवर डोळा ठेवून ‘बेस्ट’ आणि ‘एनएमएमटी’नेही आपल्या बसगाडय़ांसाठी हा थांबा सुरू केला आहे. पूर्वी बेस्टची वातानुकूलित बस मुलुंड स्थानकातून सुटून ठाणे रेल्वे स्थानक पूर्वमार्गे बोरिवलीला जात असे व पुन्हा मुलुंडला येत असे. मात्र, आता ही बस बोरिवलीहून परतल्यानंतर कोपरी येथे येते व येथूनच पुन्हा बोरिवलीकडे रवाना होते. एनएमएमटीची बस महापे स्थानकातून सुटल्यानंतर ऐरोलीमार्गे ठाणे पूर्व स्थानकात येऊन बोरिवलीत जायची आणि त्याच मार्गे पुन्हा महापेच्या दिशेने कूच करायची. मात्र, आता एनएमएमटीची वातानुकूलित बस सकाळी महापेवरून ठाण्यात दाखल होते व त्यानंतर ठाणे-बोरिवली मार्गावर धावते. या दोन्ही उपक्रमाच्या प्रवासी पळविण्याच्या युक्तीमुळे ‘टीएमटी’च्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे परिवहन प्रशासनाने या दोन्ही उपक्रमांना नुकतेच एक पत्र पाठविले असून ठाणे पूर्व स्थानकातून सुरू केलेल्या बससेवा बंद करण्याची ताकीद दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही उपक्रमांना कोपरी बसथांब्यावरून पहिला थांबा देता येणार नाही, असा टीएमटीचा दावा आहे.
 दरम्यान आमची बससेवा महापे ते डोंबिवली अशी असून कोपरीवरून बस सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा एनएमएमटीमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. अनेक थांब्यांपैकी कोपरी हा आमचा एक मार्ग आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

Story img Loader