कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दुकाने, सरकारी, निमसरकारी कार्यालयांसमोर दुचाकी वाहने उभी करणाऱ्यावरून मागील काही दिवसांत वाहन चालकांमध्ये जोरदार हाणामाऱ्या होत आहेत. याप्रकरणी मारहाण झालेल्या दोन दुचाकी वाहन चालकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी एकूण सहा जणांच्या विरुध्द मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ आहे. याठिकाणी शुल्क आकारून वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त जागा असताना वाहन चालक याठिकाणी शुल्क द्यावे लागते म्हणून बहुतांशी दुचाकी वाहन चालक कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दुकाने, आस्थापना, गल्लीबोळातील मोकळ्या जागेत वाहने उभी करून कामाच्या ठिकाणी निघून जातात.

मागील तीन महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली भागातील वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅन बंद आहेत. त्यामुळे वाहन चालक टोईंग व्हॅन कारवाईसाठी येत नसल्याने कुठेही वाहने उभी करून अलीकडे निघून जात आहेत. मागील तीन महिन्यांपासून टोईंग व्हॅन बंद असल्याने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी गजबजून गेलेल्या असतात. वाहतूक पोलिसांकडे टोईंग व्हॅन नसल्याने या वाहनांच्या वाहन क्रमांकावरून वाहतूक पोलीस फक्त कारवाई करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहणारे अभिजीत सुर्वे मंगळवारी दुपारी आपले दुचाकी वाहन घेऊन कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात आले होते. स्वामी समर्थ हाॅटेल समोर सुर्वे यांनी आपली बुलेट दुचाकी उभी करण्यास सुरूवात करताच, त्याला तेथील तीन जणांनी हरकत घेतली. याठिकाणी आमच्या हाॅटेलमध्ये भोजनाची पुडकी घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळा येईल. असे सांगून सुर्वे यांना त्यांची दुचाकी बाजुला घेण्यास सांगितले. या विषयावरून सुर्वे यांना तीन अज्ञात इसमांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सीमेंटचा ठोकळा डोक्यात मारून दुखापत केली. त्यांना पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुर्वे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुध्द तक्रार केली आहे. याच दिवशी व दुपारच्या वेळेत कल्याणमधील मुरबाड रस्ता भागात सिंधीगेट परिसरात राहणारे शाहनवाज खान (२६) हे आपल्या मित्रांसमवेत कल्याण पश्चिम येथे आले होते.

तक्रारदार शाहनवाज हे आपल्या दुचाकीवरून आले होते. ते एका उपहारगृहासमोर दुचाकी वाहन उभे करत होते. हे वाहन उभे करण्यावरून उपहारगृह चालक आणि शहानवाज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उपहारगृहाच्या मालकाने शाहनवाझ आणि त्यांच्या मित्राला मारहाण करून चाकुने दुखापत केली. या उपहारगृहातील चार जणांनी शाहनवाझ यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. शहानवाज खान यांनी मारहाण प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.