लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : बारावीची परीक्षा जवळ आली आहे. मोबाईल बघू नकोस. अभ्यास कर, असे सांगत वडिलांनी मुलाच्या हातामधील मोबाईल काढून घेतला. त्याचा राग येऊन मुलाने घरात काहीही न सांगता घर सोडले. मंगळवार बारावी परीक्षेचा दिवस उजाडला तरी मुलगा घरी न आल्याने मुलाच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची आणि त्याला कोणीतरी फूस लावून पळून नेल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील निळजे लोढा हेवनमधील एका गृहसंकुलात एक ५५ वर्षाचे गृहस्थ आपल्या कुटुंबीयांसह राहतात. हे गृहस्थ तयार कपड्यांचे व्यापारी आहेत. त्यांचा एक सतरा वर्षाचा मुलगा इयत्ता बारावीला आहे. मुलगा नवी मुंबईतील वाशी येथील आय. सी. एल. मोतीलाल झुणझुणवाला महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

बारावीची परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे मुलाने मेहनत करून अभ्यास करावा, असे बेपत्ता मुलाच्या वडिलांना वाटत होते. गेल्या बारा दिवसापूर्वी वडील दुकानातून रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घरी आले. त्यावेळी त्यांना मुलगा मोबाईलवर खेळत असल्याचे दिसले. बारावीची परीक्षा जवळ आली तरी मुलगा मोबाईलवर खेळतो पाहून वडील संतप्त झाले. त्यांनी मुलाच्या हातामधून मोबाईल काढून घेतला आणि त्याला अभ्यास करण्याची सूचना केली. त्यानंतर मुलाचे वडील दुकानात पुन्हा निघून गेले.

दरम्यानच्या काळात वडिलांनी आपल्या हातामधून मोबाईल काढून घेतल्याचा राग आल्याने मुलाने घरात काहीही न सांगता रात्रीच घरातून बाहेर पडला. तो मित्राकडे गेला असेल असे कुटुंबीयांना सुरूवातीला वाटले. मध्यरात्र होत आली तरी मुलगा घरी येत नाही म्हणून कुटुंबीयांना त्याचा त्याचे मित्र, नातेवाईक, परिसरात शोध घेतला, पण तो कोठेच आढळुन आला नाही. आपल्या मुलाला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करून मुलाच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक याप्रकरणाचा तपास करत आहे. आता बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. तरीही मुलगा घरी न आल्याने बेपत्ता पालकाच्या मुलांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या बेपत्ता मुलाचा तपास आम्ही करतच आहोत. बेपत्ता झाल्यानंतर या मुलाने पवई येथे जाऊन आपल्या मित्रांकडून काही कारण सांगून पैसे घेतले. तेथून तो निघून गेला. त्यानंतर तो कोठे गेला याचा तपास आमचे पोलीस पथक करत आहे. वरिष्ठ याविषयी मार्गदर्शन करत आहेत. -विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे.