विजेरी माळा, चिनी उत्पादनांच्या गर्दीतही मागणी; कल्याणच्या कुंभारवाडय़ात कारागिरांची लगबग
आपल्या छोटय़ाशा वातीने अंधाराचे साम्राज्य दूर करणाऱ्या पणतीने विजेरी माळा आणि चिनी उत्पादनांच्या गर्दीतही स्वतचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मातीच्या पणतीने उत्सवातील स्वदेशी बाणा कायम राखला आहे.
कल्याणच्या कुंभारवाडय़ात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो पणत्या घरोघरी प्रकाश पसरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
दिवाळीच्या झगमगाटासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी ग्राहकांनी पणत्याच खरेदी कराव्यात, त्यामुळे आपला पारंपरिक उद्योग टिकून राहील असे मत कुंभारवाडय़ातील महेंद्र प्रजापती यांनी व्यक्त केले.
दिवाळीसाठी मातीच्या पणत्या बनविण्यासाठी कुंभारवाडय़ात नवरात्रीपासूनच लगबग सुरू होते. रोज दोन ते तीन हजार पणत्या तयार केल्या जातात. मातीपासून वस्तू तयार करण्याऱ्या कलाकारांनाही पुरेसा मोबदला मिळत नसल्याने त्यांचे प्रमाणही कमी होत चालले आहे.
या क्षेत्रात पैसे कमी मिळत असल्याने अनेक कुटुंबांनी मातीच्या वस्तू तयार करणे पूर्णत: बंद केले आहे, अशी माहिती महेंद्र प्रजापती यांनी दिली. प्रजापती यांच्या तीन पिढय़ा या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र मेहनतीच्या तुलनेत पैसे फार कमी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.