गमबूट, हातमोजे, मास्क नसल्याने आरोग्य धोक्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कचरा उचलणे आणि गटार सफाई यांवर पालघर नगर परिषद दर महिन्याला लाखो रुपये खर्च करत असली तरी सफाईकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र नगर परिषदेचे दुर्लक्ष झालेले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा साधने नाहीत. गमबुट, हातमोजे, मास्क या साहित्याशिवाय त्यांना कामा करावे लागत असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

पालघर नगरपरिषदेने शहरातील कचरा उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट १६ लाख ७६ हजार रुपयांना दिले आहे, तर गटार सफाईचे काम सहा लाख २८ हजार रुपयांना दिले आहे. भाजी बाजार, मासळी बाजारसह शहरात ठिकठिकाणी साचणारा कचरा तसेच घरोघरी जाऊन घंटागाडीमधून कचरा गोळा करण्याचे काम या ठेक्याअंतर्गत करण्यात येते. मात्र हे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मात्र कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत. दरुगधी आणि अस्वच्छतेच्या वातावरणात त्यांना काम करावे लागत असून गमबूट, मास्क, हातमोजे यांच्याशिवाय त्यांना काम करावे लागत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना गमबूट, मास्क आणि हातमोजे देणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असून नगर परिषदेच्या ठेक्याच्या कारनाम्यातील अटी-शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांना याबाबत विचारले असता सफाई कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोजे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सुरक्षा उपकरणांचा दर्जा सुमार असल्याने त्याचा वापर केला जात नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ठेकेदाराने दिलेले गमबूट खूप वजनी असून त्यामुळे पायाला फोड येतात. ते घालून काम करणे कठीण आहे. हातमौजे तर काही तासांत फाटून जातात, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरोग्यावर परिणाम

गटारांमध्ये रस्त्यावरील कचरा, वाढलेले गवत आणि प्लास्टिकचा कचरा साचून गटारे तुंबतात. ही घाण सफाई कामगार हातमोजे, गमबूट आणि मास्क न वापरता साफ करताना शहरात अनेकदा दिसून येत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबतदारी नगर परिषदेची आहे. नगर परिषद शहराच्या साफसफाईवर लाखो रुपये खर्च करत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षा साधने न वापरता काम केल्याने सफाई कर्मचाऱ्यांना श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, विषाणुजन्य आजार होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean up workers unsafe work
Show comments