कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशांची लूट कल्याण डोंबिवली पालिकेशी करारबध्द असलेल्या एका खासगी एजन्सीचे स्वच्छता कामगार करत होते. या विषयीच्या तक्रारी वाढल्याने आणि हा लुटमारीचा प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर यांनी सोमवारी स्वता पाहिला. त्यानंतर देगलुरकर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खासगी कामगारांविरुध्द गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य स्वच्छता अधिकारी देगलुरकर यांनी सांगितले, पालिका हद्दीतील प्लास्टिक आणि इतर कचरा विलगीकरणासाठी पालिकेने मे. इन्फ्रान्ट्री सिक्युरीटी ॲन्ड फॅसिलिटीज एजन्सी बरोबर करार केला आहे. या एजन्सीचे खासगी कामगार पालिका हद्दीत शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची कार्यवाही करतात. या एजन्सीने पालिकेने करारात घालून दिलेल्या अटीशर्तीप्रमाणे काम करायचे आहे. पादचारी रस्त्याने जाताना रस्त्यावर थुंकला, रस्त्यावर कचरा केला अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार या कामगारांना आहेत. या कामगारांकडे पालिकेची ओळखपत्रे आहेत.

हेही वाचा…पाण्याच्या टाकीत पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला

काही महिन्यांपासून मे. इन्फ्रान्स्टी एजन्सीचे कामगार कल्याण रेल्वे स्थानक भागात सकाळच्या वेळेत रेल्वे स्थानकातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना आम्ही पालिकेचे कामगार आहोत अशी ओळखपत्रे दाखवून त्यांना दटावत होते. त्यांच्यावर तुम्ही रस्त्याने चालताना कचरा केला, तुमच्याजवळ प्रतिबंधित वस्तू आहेत अशा प्रकारचे ठपके ठेऊन अवाजवी पैशांची मागणी करत होते. याविषयी अनेक तक्रारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे आल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी याविषयी पालिकेला कळविले होते, असे देगलुरकर यांनी सांगितले.

आयुक्तांनी खासगी कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळीच देगलुरकर वेशांतर करून कल्याण रेल्वे स्थानक भागात आले. ते खासगी कामगारांवर पाळत ठेऊन होते. कामगार रेल्वे स्थानकातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना त्रास देत असल्याचे त्यांना आढळले. तक्रारींची खात्री पटल्यावर देगलुरकर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मे. इन्फ्रान्ट्री एजन्सीने पालिके बरोबरच्या करारातील अटींचा भंग केला. पालिका आणि प्रवाशांची फसवणूक केली म्हणून कामगार सोनु सिंग आणि इतरांंवर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या एजन्सीला यापूर्वीही करार भंगप्रकरणी दंड ठोठावला होता, असे देगलुरकर यांनी सांगितले. या प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे आली की तपास सुरू करणार आहोत, असे तपास अधिकारी उपनिरीक्षक घाटगे यांनी सांगितले.

हेही वाचा…कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला, मधुचंद्रासाठी काश्मीर की मक्का मदिनेला जाण्यावरून वाद

पालिकेचा मे. इन्फ्रान्ट्री सिक्युरीटी ॲन्ड फॅसिलिटीज एजन्सी बरोबर खासगी सेवक पुरविण्याचा करार आहे. खासगी सेवक स्वच्छतेची कामे करण्याऐवजी कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून अवाजवी पैसे वसुल करत होते. कराराच्या अटींचे उल्लंघन होत असल्याने आयुक्तांच्या आदेशावरून गुन्ह्याची कारवाई केली. वसंतु देगलुरकर मुख्य स्वच्छता अधिकारी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning workers under kalyan dombivli municipality contract looting passengers at kalyan station sud 02