एखादी घटना, दुर्घटना घडते त्या वेळी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर असतातच असे नाही. रस्त्यावरून ये-जा करणारा पादचारी हातामधील कचरा कुंडीत टाकतो की रस्त्यावर फेकतो यावर कुणी लक्ष ठेवायचा हा प्रश्नही मागे उरतोच. शहर स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या अंगाने महत्त्वाचे असलेले असे प्रश्न उपस्थित करीत कल्याणधील गांधी चौक भागातील ३० ते ४० महिलांनी संघटित होऊन ‘युनिटी ऑफ गांधी चौक’ हा व्हॉट्स ग्रुप तयार केला आहे. या गटाच्या माध्यमातून किमान प्रभागातील नागरी समस्या व सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती या गटातील सक्रिय कार्यकर्त्यां मृदुला साठे यांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वी कल्याणमधील गांधी चौक भागातील नयन जैन या विद्यार्थ्यांचे त्याच्या घराजवळून अपहरण करून त्याची मुरबाडजवळ हत्या करण्यात आली होती. अशा घटना घडण्यापूर्वीच रहिवाशांमध्ये जागरूकतेचे वातावरण असणे गरजेचे आहे. प्रभागातील प्रत्येक रहिवाशाने सजग राहावे या उद्देशातून ‘युनिटी ऑफ गांधी चौक’ हा गांधी चौक भागातील महिलांचा गट स्थापन करण्यात आला आहे. गांधी चौक भागातील नागरी समस्या, त्याची तड लावण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे, कचराकुंडी, गटार फुटले असेल तर त्याची माहिती महापालिकेला देणे. काही दुचाकीस्वार बेफाम दुचाकी चालवीत असतील तर त्यांचे वाहन क्रमांक घेऊन वाहतूक पोलिसांना देणे, असे उपक्रम या गटाकडून राबविले जात आहेत. बाजारपेठ पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या भागाचे नगरसेवक जव्वाद डोण, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, काही नगरसेवकांना या गटात त्यांच्या मागणीवरून सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रभागात काय चालले आहे याची माहिती नगरसेवक, पोलिसांना मिळावी या उद्देशाने या मंडळींना गटात सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक सोसायटीतील महिला या गटात सहभागी असल्याने गांधी चौक ते आगलावे आळी अशा चौक परिसरात कोठे काय चालले आहे याची माहिती ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील रहिवाशांना कळते, असे साठे यांनी सांगितले. प्रभाग, विभागाप्रमाणे जागरूक महिला, तरुण, तरुणी, पुरुष मंडळींनी एकत्र येऊन असे गट तयार केले तर शहरातील नागरी समस्यांना आाळा घालता येईल, असा विश्वास गटातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा