वर्तकनगरमधील वेदांत संकुलाकडून माणुसकीचे दर्शन

एकीकडे ब्लॉक संस्कृतीत शेजारधर्माचा अभाव दिसून येत असताना ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत संकुलातील रहिवाशांनी परिसराची स्वच्छता करणाऱ्या सेवकाच्या आजारपणात मोलाची मदत करून समाजातील संवेदनशीलता टिकून असल्याचा प्रत्यय दिला. स्वच्छता सेवकाच्या उपचारांसाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता आहे. फेडरेशनच्या वतीने वेदांतवासी ती रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

धावपळीचे जीवन, आपल्यापुरते पाहण्याची संकुचित वृत्ती आणि तुटत चाललेला संवाद ही महानगरीय जीवनशैलीची लक्षणे आहेत. घराचा दरवाजा उघडा ठेवणे या संस्कृतीत अशिष्ट मानले जाते. अनेक संकुलांतील रहिवाशांना आपल्या शेजारी कोण राहतेय हेही माहिती नसते. ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत या गृहसंकुलातील रहिवाशांनी मात्र या नव्या संस्कृतीतही एकमेकांप्रती आस्था आणि स्नेह कायम राखला आहे.

येथे गेली २० वर्ष रमेश लाल (५५ वर्ष) हे वेदांत सोसायटीमध्ये स्वच्छतेचे काम करतात. ते या संकुलाशेजारील भीमनगर वस्तीत राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना त्यांना उजव्या पायाचा अंगठा गमवावा लागला. तसेच पुढील उपचार झाले नाहीत तर, त्यांना पाय गमवावा लागेल, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. अजय सिंग यांनी दिली. मात्र पुरेसे पैसे नसल्याने रमेशलाल उपचार करून घेऊ शकत नव्हते. अशा बिकट अवस्थेतही ते कामावर येत होते. त्यांची ही अवस्था येथील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यावर वेदांत हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रहिवाशांनी त्यांच्या उपचारांसाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. सध्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या उपचारांसाठी दोन लाखांच्या आसपास खर्च येणार आहे. त्यासाठी संकुलातील इमारतींमध्ये सूचना फलक लावून निधी गोळा करण्यात येत असल्याचे रमन चौधरी यांनी सांगितले.

Story img Loader