लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : सप्टेंबर महिन्यात अवघ्या १५ दिवसात पावसाने सरासरी ओलांडल्यानंतर या आठवडय़ात तापमानात नीचांकी नोंद झाली. गुरुवारी सकाळपासूनच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये गारवा जाणवत होता. तर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापुरात झाली.
त्यामुळे पावसाळय़ात हिवाळय़ाचा अनुभव येत होता. गुरूवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळीही गारवा जाणवत होता.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले. हा पाऊस नवरात्रोत्सवातही पडण्याची शक्यता असताना गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. गुरूवारी दिवसभर आणि शुक्रवारी पहाटे हा गारवा अनुभवास आला. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सरासरी २५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यात सर्वात कमी नोंद बदलापुरात झाली.
कारण काय?
आकाशात ढगांची गर्दी होते. त्याचवेळी वाऱ्याला गती नसल्याने काळे ढग जमिनीपासून अवघ्या ३०० ते ४०० फुटांवर तरंगतात. त्यात आद्र्रता असल्यामुळे स्थानिक पातळीवर शहरांचे तापमान कमी होते. पाऊस पडेल असे वाटते, पण त्याऐवजी थंडी जाणवते, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
वेगळे काय? गुरुवारी बदलापुरात वर्षांतील सर्वात कमी म्हणजे २३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. ते थंडीतल्यासारखेच होते. पुणे आणि नाशिकच्या तापमानापेक्षाही कमी तापमान गुरुवारी मुंबईत आणि इतर शहरात नोंदवले गेले.
अचानक गारवा..
गुरूवारी नाशिकचे तापमान २४.७ तर पुण्याचे तापमान २८.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबईचे तापमान अवघे २५.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे पुणे, नाशिकपेक्षा मुंबईत अधिक गारवा होता.