ठाणे : किसननगरप्रमाणेच लोकमान्यनगर विभागाचाही समुह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) माध्यमातून विकास करणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केली. लोकमान्यनगर भागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे हे दरवर्षी लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभागातील रहिवासी नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी दिपावली निमित्ताने कौटुंबिक स्नेह भोजन आनंद मेळावा आयोजित करतात. यंदाही त्यांनी रविवारी सावरकरनगर येथील श्रीमती इंदिरा गांधी महाविद्यालयात हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
हेही वाचा >>> ठाण्यात ३६५८ क्षयरोग रुग्ण निक्षय मित्राच्या प्रतिक्षेत; ४१३८ पैकी ४८० क्षयरोग रुग्णांना मिळाले निक्षय मित्र
जगदाळे यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. जगदाळे यांनी यावेळी केलेल्या प्रास्ताविक भाषणात लोकमान्यनगर विभागाचाही क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य करत तसे ग्वाही भाषणादरम्यान दिली. क्लस्टर योजनेबाबत ज्या काही अडचणी होत्या, त्या नगर विकास मंत्री असताना सर्व दूर केल्या आहेत. त्यामुळे ही योजना राबविण्यास आता कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या आनंद मेळाव्याला लोकमान्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिगंबर ठाकूर, योगेश जानकर, विजय पडवळ, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, वनिता घोगरे, परिवहन सदस्य संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.