ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केेलेल्या आवाहनानुसार राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्राचीन कौपीनेश्वर मंदीराची स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाणे येथील प्राचीन कौपिनेश्वर मंदिर स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. अयोध्येतील राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थ क्षेेत्रे, मंदीरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. ठाणे शहरातील मंदिरे स्वच्छ करण्याबरोबरच त्याठिकाणी रोषणाई करण्याच्या सुचना पालिका आयुक्तांना दिल्या असून राज्यभरातही मंदीर स्वच्छतेवर राज्य सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… भाजप, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी; दिघा गाव स्थानकाच्या लोकार्पणावेळी वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता भारत अभियान राबविले. याच प्रेरणेतून राज्यात सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच सर्वंकष स्वच्छता अभियानानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रदुषणात मोठी घट झाली आहे, असा दावा त्यांनी केला. सर्वंकष स्वच्छता अभियान ही एक लोकचळवळ निर्माण करायची आहे. या चळवळीच्या माध्यमातून राज्य स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि निरोगी करण्याचे आहे, असेही ते म्हणाले.

जनता टिकाकारांना जागा दाखवेल

टिका करणाऱ्यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे. हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण मोदींनी मंदिर पण तयार केले आणि तारीख पण जाहीर केली. त्यामुळे जनता टिकाकारांना ओळखून आहे आणि त्यांना जनता योग्यवेळी जागा दाखवेल, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरेंवर टिका

उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी केवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी इतके त्यांचे काम मर्यादित आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सवंगडी म्हणून वागवत होते. पण, उद्धव ठाकरे हे पक्षाला स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात. आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाहीतर घरगडी आणि नोकर समजतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.