ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू झाली आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्याची सफाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन रस्ते सफाईसाठी झाडून कामाला लागल्याचे चित्र होते. आपले घर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. तरच ठाणे निरोगी होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरांत एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरूवात शनिवारी वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ मधून झाली. शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी, शाळा-महाविद्यायातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले.
एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हातमोजे घालून जलवाहिनी हाती घेतली आणि रस्ते, पदपथालगतच्या भिंती धुण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रस्ते साफ-सफाईसाठी हातामध्ये झाडू घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हाती झाडू आल्याने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनीही हाती झाडू घेऊन रस्ते झाडलोट करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथे भजनी मंडळही उपस्थित होते. त्यामध्येही ते सहभागी झाले.
हेही वाचा – ठाणे : नववर्ष स्वागतानिमित्ताने साडे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त
सर्वंकष स्वच्छता मोहिमेत आता नागरिक सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने राज्यात ही मोहीम राबविण्यात येईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी वृक्षारोपन केले जाणार आहे. आपले घर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. तरच ठाणे निरोगी होईल असेही शिंदे म्हणाले.