ठाणे : शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांना आमदारकीचे उमेदवारी देण्यात येत होती. परंतु माझ्या आणि राजन विचारे यांच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आमदारकीचे पहिले तिकीट दिले, असा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केला, बाळासाहेब यासाठी आम्ही माफी मागतो असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना फोडणार्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढीदेखील त्यांना माफ करणार नसल्याची टीका राऊत यांनी केली. तसेच ही निवडणूक भारत मातेची आहे. ही निवडणूक संविधानाची आहे. ही निवडणूक घटनेची आहे. ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा : कळवा, मुंब्रा, दिव्यात पुन्हा बेकायदा बांधकामे, उबाठाने समाजमाध्यमांवर प्रसारित केली बांधकामांची छायाचित्रे
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विरोधकांवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्यातील छोट्या माणसाला मोठा नेता केला. ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी मनापासून प्रेम केले. ज्या ठाण्याला बाळासाहेबांनी आपले मानले. त्याच बाळासाहेबांच्या मातोश्रीवर पहिला खड्डा ठाण्यातच खणला गेला. गद्दारीचा छाप ठाणेकरांच्या डोक्यावर बसला आहे तो लवकरच मिटवायचा असल्याचे आव्हाड म्हणाले.
हेही वाचा : कल्याणमध्ये बाळ हरदास यांची शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, बाळ हरदास यांनी आरोप फेटाळले
म्हस्केंना उमेदवारी म्हणजे मस्करी केल्यासारखेच – सुषमा अंधारे
ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे महायुतीने सगळी मस्करी केल्यासारखेच आहे असा टोला अंधारे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही यातच सगळी नाचक्की असल्याचेही म्हणाले.