ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सोडण्याचा निर्णय जवळपास पक्का झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गजानन कीर्तिकर खासदार असलेल्या मुंबईतील उत्तर पश्चिम हा मतदारसंघ भाजपला सोडून ठाण्यातील जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून भाजपने या ठिकाणी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी केलेल्या मोर्चेबांधणी नंतर ठाण्याचा मतदार संघ सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद गेल्या काही निवडणुकांपासून वाढल्याने यंदाच्या जागा वाटपात पक्षाने या मतदारसंघावर दावा केला होता. ठाणे लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने भाजपाचा दावा अधिक प्रबळ होत गेला होता. गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. भाजपाकडून संजय केळकर, नवी मुंबईचे नेते गणेश नाईक, विनय सहस्त्रबुद्धे अशी काही नावे सातत्याने पुढे येत होती. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात पडणार याविषयी संभ्रमाचे वातावरण होते.
हेही वाचा : कल्याण : वडवलीत टोळक्याची तलवारीने दहशत, मासळी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा क्षेत्रात मोडतो. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या पाळण्यात गेला तर चुकीचा संदेश जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांचे मत होते. दोन दशकांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला होता, असे असताना मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाला द्यावा लागल्यास विरोधी पक्षांच्या हाती आयता मुद्दा लागेल अशी भीती मुख्यमंत्री समर्थकांमध्ये होती.
हेही वाचा : ठाणे: गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त नितीन कंपनी चौकातील सिग्नल कायमस्वरूपी
जागा वाटपाच्या चर्चेत भाजपाने पाण्यासाठी आग्रह धरल्याने या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. कोणत्याही परिस्थितीत ठाणे आपल्या पक्षाला हवा असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरल्याने गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आणि शिवसेनेला देण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ठाण्याच्या बदल्यात मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्याचा निर्णय पक्का झाल्याचे सांगण्यात येते. गजानन कीर्तिकर यांचा पत्ता यामुळे कट होण्याची शक्यता आहे.