ठाणे: आरोग्य क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे असलेले योगदान लक्षात घेऊन, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला रविवारी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी दुपारी ३४० आशा स्वयंसेविकांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा स्वयंसेविकांना एकप्रकारे भाऊबीजेची भेट दिल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळाने माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळाने सानुग्रह अनुदानासह काही मागण्या मांडल्या होत्या. त्यावर, मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ भाऊबीजेची भेट म्हणून पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. तसेच हे अनुदान तत्काळ देण्याचे आदेशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सुचना देऊन आशा स्वयंसेविकांना अनुदान देण्याची प्रक्रीया सुरु केली होती.
हेही वाचा : बापरे ! उल्हासनगरमध्ये माथेफिरूने चक्क इमारतीवर सोडले रॉकेट
दरम्यान, मंगळवारी या सर्व सेविकांना अनुदानाची रक्कम देण्यात आली. आशा स्वयंसेविकांना प्रथमच सानुग्रह अनुदान मिळाले आहे. ३५४ पैकी १४ आशा स्वयंसेविकांना धनादेशाने सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, उर्वरित ३४० आशा स्वयंसेविकांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले आहेत. ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली ही समाधानाची गोष्ट असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.