उद्धव ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांनी पत्र लिहून सुरक्षा कमी केल्यासंदर्भात व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार असतील असं थेट महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना कळवताना राजन विचारेंनी बाळासाहेबांची शिवसेना गटातील ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्केंवरही निशाणा साधला होता. याच टीकेवरुन म्हस्के यांनी राजन विचारेंना उपहासात्मक टोला लगावला आहे.
नक्की वाचा >> पुणे तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार! पाकलमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; म्हणाले, “पालिकेत भाजपाची सत्ता असूनही…”
आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असं पत्र विचारे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना पाठवलं आहे. याच पत्रामध्ये त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणेकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली आहे. “१३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेट घेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनाकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावरे हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे,” असे प्रकार सुरु असल्याचं विचारेंनी पत्रात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> २५ हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ED चौकशीसंदर्भात म्हणाले, “जो कोणी राज्यकर्ता…”
विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे ठाण्यातील निकटवर्तीय असणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्केंच्या सांगण्यावरुन हे सर्व केलं जात असल्याचाही आरोप पत्रातून केला आहे. “चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला आहे,” असा उल्लेख विचारेंनी पत्रात केला आहे. याच आरोपांना आता म्हस्केंनी उत्तर दिलं आहे.
“कस्तुरी मृगाच्या नाभीत सुगंध असतो. तरीही तो सुंगधाच्या शोधात अख्खे जंगल पालथे लागतो. त्याचप्रमाणे मला माझ्या शक्तीची जाणीव करून दिली, त्याबद्दल खासदार राजन विचारे यांचा आभारी आहे. माझ्या एका इशाऱ्यावर प्रशासन काम करते, इतकी माझी शक्ती आहे, हे मला माहितीच नव्हते. तसेच कोणतेही शासकीय पद नसतानाही सर्व यंत्रणा माझ्या म्हणण्याप्रमाणे काम करतात, याचा मला आनंद तर आहेच. पण, आनंद दिघेंचा शिष्य असल्याचा गर्वही आहे. सद्यस्थितीत एवढेच सांगेन. पण, वेळ आल्यावर उत्तर देईन,” असं म्हस्के यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Andheri Bypoll: आता लढाई श्रेयवादाची? माघार भाजपाची कौतुक मुख्यमंत्री शिंदेंचं; सरनाईक म्हणतात, “मी लिहिलेल्या पत्राचा…”
शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटतो, असा आरोप विचारे यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. तसेच आपल्याला पुन्हा आधीप्रमाणे पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पत्रावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पत्रासंदर्भात बोलताना चिंता व्यक्त करत पुरेशी सुरक्षा लोकप्रतिनिधींना पुरवली पाहिजे असं म्हटलं आहे.