ठाणे : राज्यभरातील प्रचार दौरे आटोपून मंगळवारी सायंकाळी ठाण्यात परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासंबंधी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तसेच ठाण्यासाठी इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. अडीच तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतरही उमेदवार कोण असेल याविषयीची संदिग्धता कायम राहिली आहे.
हेही वाचा >>> घटना बदलाची चर्चा दिशाभूल करणारी – मुख्यमंत्री शिंदे
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख दोन दिवसांवर आली असतानाही महायुतीचा ठाण्याचा उमेदवार ठरलेला नाही. त्यातच भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघासाठी सायंकाळी उशिरा नामनिर्देशन पत्र घेतल्याने वेगवेगळया चर्चा सुरु झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारी ठाण्याची जागा महायुतीत कोणाच्या पारडयात पडणार याविषयी उत्सुकता ताणली गेली असताना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या पक्षातील इच्छुकांची एक बैठक शुभदीप या बंगल्यावर बोलवली. या बैठकीस आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित होत्या. या बैठकीत मुख्यमंत्री ठरवतील तो उमेदवार सर्वांना मान्य असेल असे ठरले.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तीन तारखेस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असे या बैठकीत ठरले. या बैठकीत उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले तरी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.