ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये कमालिची रस्सीखेच सुरु असताना मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नेते नरेश म्हस्के यांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेते गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत म्हस्के यांचे जागोजागी बॅनर झळकले असून यामुळे खुद्द मुख्यमंत्री ठाणे लोकसभेसाठी आग्रही असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेचे जागा वाटप हे भाजपचे दिल्लीतील नेते ठरवतील तशाच पद्धतीने होईल हा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी बैठकांचा धडाका सुरु आहे. पक्षाचे नेते डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षाकडून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जात आहेत. गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हेदेखील ठाण्यातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी ठाण्यात कार्यक्रमांचा रतीब मांडला आहे. शहरातील एकही कार्यक्रम चुकवायचा नाही असा नाईक यांचा प्रयत्न दिसतो. मुख्यमंत्री पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणातही अधूनमधून भाजप नेते बंडाची भाषा बोलत असतात. इतके दिवस याकडे कानाडोळा करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी अलिकडे मात्र भाजपला या मुद्दयावरुन अंगावर घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – ठाणे : बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला
हेही वाचा – ठाणे : भिवंडीत उद्या पाणी पुरवठा नाही
फलकबाजीची चर्चा
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई आणि मिरा-भाईदर शहरात उभारलेले फलक सध्या चर्चेत आले आहेत. नवी मुंबई हा भाजप नेते गणेश नाईक यांचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत असलेले स्थानिक शिवसेना नेते आणि नाईकांमध्ये विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी नवी मुंबईतील पक्षाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा नाईकांना असलेला विरोध स्पष्ट केला. या पार्श्वभूमीवर वाशीतील शिवाजी चौकात म्हस्के यांचे लागलेले होर्डिंग सध्या चर्चेत आहे. ठाण्याचे माजी महापौर राहिलेले म्हस्के हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिंदे यांनी बंड करताच ठाण्यातील त्यांची सगळी सुत्र म्हस्के यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. विरोधकांना अंगावर घेणे, मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावणे, पक्षाची बाजू मांडणे यासारखी कामे म्हस्के यांनी चोखपणे बजावली आहेत. ठाण्यातून विधानसभेसाठी इच्छुक असणारे म्हस्के यांचे नाव सध्या ठाणे लोकसभेसाठीही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन नवी मुंबई आणि मिरा-भाईदर शहरात केलेली बॅनरबाजीमुळे भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केल्याशिवाय म्हस्के हे पाऊल उचलतील का अशीही चर्चा यानिमित्ताने आहे.