अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने समेट घडवण्यात आली आहे. विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष होता. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांमध्ये हा संघर्ष तीव्र झाला होता. त्यामुळे ही जागा धोक्यात आल्याची चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ यांनी दोन्ही गटांना बोलवून चर्चा केली आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभेचा तिढा सुटल्याचे बोलले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ ही एकमेव विधानसभा आहे जी शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा राखणे शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहे. मात्र स्थानिक पातळीवर अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपासून हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला. अरविंद वाळेकर यांनी अनेकदा आमदार बालाजी किणीकर यांच्यावर थेट हल्ले चढवले. त्यामुळे शिवसेनेची ही जागा धोक्यात आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे एक हाती वर्चस्व असतानाही लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या मतदारसंघात ५८ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांना धोका निर्माण होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच पक्षांतर्गत विरोधी पराभवाला कारणीभूत ठरू शकतो अशीही चर्चा होती. त्यामुळे या प्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली.
हेही वाचा…कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांच्या फलकाची चर्चा, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा फलकातून इशारा
नुकतेच अंबरनाथ शहरातील या दोन्ही गटांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेनंतर दोन्ही गटांमधील वाद मिटवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्वतःच्या फेसबुक या समाज माध्यमावर एक फोटो पोस्ट करत चर्चा केल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अरविंद वाळेकर , राजेंद्र वाळेकर, राजेंद्र चौधरी आणि गोपाळ लांडगे दिसत आहेत. या बैठकीनंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते.
हेही वाचा…उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीत
याबाबत शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांची संपर्क केला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी तसेच त्यांच्या मोठ्या विजयासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी करू असेही वाळेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. लवकरच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना या बैठकीविषयी सांगू असेही वाळेकर म्हणाले. दोन गटातील या वादामुळेच शिवसेनेच्या पहिल्या यादीत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचे नाव टाळल्याचे बोलले जाते. मात्र त्यांना शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म दिल्याची माहिती मिळते आहे.