कळवा पुलावरून सध्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पुलाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून मुख्यमंत्र्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला. कौन किसकी शादी में जा रहा है, हे सगळ्यांना माहिती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नेमका वाद काय?
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असताना या पुलाच्या श्रेयावरुन वाद सुरू झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. “या पुलासाठीची मागणी मी पुढे रेटली होती. ती मान्य झाली, पुलाच्या कामाची सुरुवात झाली आणि आज त्याचा शेवट झाला. कुणीतरी असं काम सुरू करतं, उद्घाटनाला दुसरं कुणीतरी असतं. त्यात काय एवढं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला.
दरम्यान, आव्हाडांच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देताना आव्हाडांना लक्ष्य केलं. “कुणीतरी वेगळं उद्घाटन करत नाहीये, राज्याचा मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहे. आणि हा सगळा खर्च महापालिकेनं केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झालेला नाही. प्रयत्न सगळेच करत असतात. आमदार, खासदार, महापौरही प्रयत्न करतात. सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रकल्प होत असतात. पण प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती आमच्याकडे आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“ठाण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. आम्ही कधीच दुजाभाव केला नाही की अमुक मतदारसंघात कुणाचा आमदार आहे. कोट्यवधी रुपयांची कामं ठाणे पालिका हद्दीत केली आहेत. आणि लोकांना माहिती आहे की कोण किस के शादी में जा रहा है”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.