भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

कल्याण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सुरू आहे. विविध प्रकारचा त्रास या मंडळींकडून भाजप कार्यकर्त्यांना दिला जात आहे, असा आरोप कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात भाजपचे काहीच चालत नाही, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सोमवारी केली होती. हा संदर्भ देत आ.गणपत गायकवाड यांनी सांगितले, आ. पाटील जे म्हणाले त्यामध्ये खूप तथ्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांचे विविध प्रकारे त्रास देऊन नुकसान करत आहेत.

हेही वाचा >>> रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता कधीही वरिष्ठ नेत्याचे आशीर्वाद, पाठबळ असल्या शिवाय इतर पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्याला बोलू शकत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विषयी आम्ही थेट बोलू शकत नाही. परंतु जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचक इशारा मिळतो. तेव्हाच स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ता त्यांच्या विरोधात बोलू शकतो. तसाच प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुरू आहे. ते स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांना पाठबळ देतात. त्या पाठबळातून हे शिवसैनिक भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विविध प्रकारे त्रास देतात, असे आ. गणपत गायकवाड यांनी सांगितले. हा त्रास आम्ही फार काळ सहन करणार नाही, असा इशारा आ. गायकवाड यांनी दिला.

भाजप आ. गायकवाड हे राज्यातील सत्तास्थानातील एक महत्वाचे आमदार आहेत. त्यांनीच हे आरोप केल्याने शिंदे पिता-पुत्र आणि आ. गायकवाड यांच्या मधील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या विषयाकडे कसे बघतात याकडे भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या नजरा आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत गावदेवी येथील बेकायदा इमारत भुईसपाट, उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेची रात्रंदिवस कारवाई

कल्याण पूर्वेत चढाओढ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक महेश गायकवाड जोरदार प्रयत्न करत आहेत. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात विविध प्रकारची विकास कामे, नागरिकांशी दैनंदिन संपर्क, रखडलेली विकास कामे मार्गी लावणे अशी कामे ते करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शिंदे यांच्या पाठबळामुळेच महेश गायकवाड कल्याण पूर्व भागात विकास कामे करुन आ. गायकवाड यांना डावलण्याचा, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार गायकवाड समर्थकांचे म्हणणे आहे. या धुसफुसीमुळे आ. गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर थेट शरसंधान केले असल्याची चर्चा आहे. खासदार शिंदे समर्थकांकडून मागील दोन वर्षापासून शिवसेनेत प्रवेश न करणाऱ्या भाजपसह शिवसेनेतील (उबाठा) कार्यकर्त्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. या त्रासामुळे हैराण झालेला कल्याण, डोंबिवली परिसरातील एक मोठा गट आता शिंदे पिता-पुत्रा विरुध्द आक्रमक होण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde mp shrikant shinde harassing maharashtra bjp workers says bjp mla ganpat gaikwad zws
Show comments