ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ३७ कोटी ६८ लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आरमाडा ही दोन वाहने आहेत. तसेच गेल्या पाच वर्षात शिंदे यांच्या संपत्तीत २४ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिंदे यांचे शिक्षण एमएपर्यंत झालेले आहे.
शिवसेनेतील बंडानंतर ठाणे लोकसभेची जागा जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत ठाण्याचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवार दिली असून याठिकाणी शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत होणार आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट
मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी मिरवणुकी काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीदरम्यान त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. या निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञानुसार त्यांच्याकडे एकूण ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० तर, स्थावर मालमत्ता २८ कोटी ४६ लाख ८० हजार इतकी आहे. २०१९ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे १३ कोटी ६६ लाख ७४ हजार ९३२ इतकी मालमत्ता होती. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत २४ कोटी १ लाख ८३ हजार २१८ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ३७ कोटी ६८ लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आरमाडा ही दोन वाहने आहेत. त्यांनी आरमाडा हे वाहन २००६ मध्ये तर, बोलेरो हे वाहन २०११ मध्ये खरेदी केलेले आहे. तर, पत्नी लता यांच्या नावावर एक टेम्पो, दोन इनोव्हा, एक स्कार्पिओ हे वाहन आहे. शिंदे यांचे शिक्षण एमएपर्यंत झालेले आहे.