ठाणे : विकासकामे, कल्याणकारी योजना आणि उद्योग यांची सांगड घालून राज्याचा विकास करण्याचे काम सरकारने केले. लाडकी बहिण योजना तर गावोगावी सुपरहिट झाली आहे. लाडके भाऊ आणि इतर घटकांसाठीही योजना राबविल्या आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेवर येण्याची पुन्हा संधी मिळाली तर, तुमच्यासाठी आणखी योजना राबवेन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना केले.

ठाणे शहरातील तलावपाळी, रहेजा काॅम्पलेक्स येथे विविध संस्थांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावत तरुणाईसोबत संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला पण, या कालावधीत सर्वाधिक कामे करण्याचा मान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाला. जनतेने आमदार बनवले आणि यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यामुळे माझ्या कामांचे श्रेय हे जनतेचे आहे. विकासकामे करण्याचे काम सरकारने केले असून हाच आमचा अजेंडा आहे. पुर्वीचे सरकार असताना आपले राज्य तिसऱ्या क्रमांकावर केले होते. पण, आमचे सरकार आल्यानंतर राज्याला प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा >>>Maharashtra Assembly Election 2024 : जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे नजीब मुल्लांसमोर आव्हान

विकासकामे, कल्याणकारी योजना, उद्योग यांची सांगड घालून राज्याचा विकास करण्याचे काम सरकारने केले. लाडकी बहिण योजना गावोगावी सुपरहिट झाली आहे. इतर घटकांसाठीही योजना राबविल्या आहेत. अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. आणखी काही योजना माझ्या डोक्यात आहेत. राज्यात सत्तेवर येण्याची पुन्हा संधी मिळाली तर, तुमच्यासाठी आणखी योजना राबवेन, असेही ते म्हणाले. एकदा जे मी बोलतो, ते करतो. जे होणार आहे, तेच बोलतो. यामुळेच आमच्या सरकारने घोषणा केलेल्या योजना कागदावर राहिल्या नाहीतर त्या प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. आताची पिढीही आपले उत्सव आणि परंपरा पुढे नेत आहे, याचा आनंद जास्त आहे. कारण आपला देश तरुणाईच्या देश आहे. सांस्कृतिक वसा आणि वारसा जोपासण्याचे काम हे आपण करत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक उत्सव सुरू केले आणि ते उत्सव पुढे नेण्याचे काम आपण सुरू ठेवले, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

 मी तुमच्या परिवारातील एक सदस्य आहे. सीएम म्हणजे काॅमन मॅन. त्यामुळे कुणालाही भेटतो. कोणताही प्रोटोकाॅल नाही. सर्वांना भेटण्यासाठी उपलब्ध असतो, हीच माझी ओळख आहे, असे सांगत येत्या २० तारखेला मोठी दिवाळी साजरी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो. ही दिवाळी नवीन सुख समाधान आनंद घेऊन येवो. अशा प्रकारच्या मी मनापासून शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.