ठाणे : देशात आणि राज्यात विकासाचे धोरण घेऊन आम्ही निवडणूक लढवत असून यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय बोलावे आणि काय आरोप करावे, हेच सुचत नसल्यामुळे आम्ही केलेल्या विकासकामांवरून लोकांचा लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान बदलाची चर्चा करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा संघटक विवेक खांबकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >>> काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांना शरद पवार गटाच्या शुभेच्छा; अंबरनाथमध्ये फलकबाजीमुळे शरद पवार गटातही गळतीची चर्चा
हे काम करणारे सरकार असून हे घरी बसणारे किंवा फक्त फेसबुक लाइव्ह करणारे सरकार नाही. प्रत्यक्ष लोकांच्या सुख दु:खामध्ये धावून जाणारे सरकार आहे आणि यामुळेच मोठया प्रमाणावर लोक विश्वास दाखवत असून तो आणखी वाढतच जाणार आहे, असे शिंदे म्हणाले. नागरिक महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती देत आहेत. २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करत मतदारांशी बेईमानी करून त्यांचा विश्वासघात केला. त्यांनी केलेली चूक आम्ही सुधारून बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार राज्य स्थापन केले आहे.
कल्याणमध्ये भक्कम स्थिती कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसेंदिवस मजबूत होत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली कामे पाहून नागरिक महायुतीबरोबर येत आहेत. कल्याणमधील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण आणखी मजबूत झाला आहे. मी अजूनही कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलेला नसून महाराष्ट्रभर फिरत आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामुळे २०१४ ला मला जशी चिंता वाटत होती, तशी २०१९ मध्ये वाटली नाही आणि आताही तशी वाटत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.