लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान सोमवारी २० मे रोजी असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची सुप्र इच्छा होतीच, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं हे साफ खोटं आहे, असं एकनाथ शिंदे या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे.
“उद्धव ठाकरेंना हिंदुत्व नकोसं झालं आहे”
उद्धव ठाकरेंच्या भाषणांमधून भगवा ध्वज गायब झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरीत असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
“पाकिस्तानचा झेंडा प्रचार मिरवणुकांमध्ये नाचवायचा आणि भगव्याच्या नावाने बोटे मोडायची. द्रेशद्रोह्यांना निवडणूक प्रचारात फिरवायचे आणि देशभक्त संघटनांना शिव्याशाप द्यायचे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात गळे घालायचे. ठराविक व्होट बँकेची मतं मिळवण्यासाठी आणखी किती लांगूलचालन करणार?,” असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
“उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील”
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या एका विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे व अजित पवारांना सरकारमध्ये येण्याचं आवाहन केल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वी सर्व प्रादेशिक पक्ष या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या विधानाला ही पार्श्वभूमी होती. शरद पवार काहीही म्हणोत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष आधीच काँग्रेसपुढे लीन केला आहे. उद्धव काँग्रेससमोर लीन झाले आहेतच; लवकर विलीनही होतील”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मविआ सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाधिकारशाहीवर आक्षेप असताना आता सरकारमध्ये अजित पवार कसे? असा प्रश्न केला असता “महाविकास आघाडीत परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. हा फरक समजून घ्यायला हवा”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.