ठाणे : चांगले आणि नाविण्यपूर्ण काम करणाऱ्याचा मी सन्मान करतो. काम करण्याची माणसाला जिद्द हवी. राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. एसटीचे स्वच्छतागृह चांगले असले पाहिजे. चालकांचे विश्रांतीगृह चांगले असले पाहिजे. पुढील दोन ते तीन दिवसांनी मी स्वत: एसटी आगाराला भेट देईल. त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण खोपट येथील एसटी थांब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडला. यावेळी ते बोलत होते. थांबणारा माणूस नेहमी बाहेर जातो. त्यामुळे मला पळणारा माणूस हवा आहे. एसटी थांबे चांगले असावे, तिथे सुविधा असल्या पाहिजेत. औद्योगिक विकास महामंडळाने एसटी थांबे सुशोभिकरणासाठी ६०० कोटी रुपये दिले आहे. खोपट हा सर्वांत जुना एसटी थांबा असूनही तिथे रंगरंगोटी करण्यात आली नाही. चांगले आणि नाविण्यपूर्ण काम करणाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सन्मान मी करत असतो. मी स्वत: स्वच्छता अभियानात भाग घेत आहे. एसटी थांब्यावरील सर्व स्वच्छतागृह, विश्रांतीगृह चांगले असले पाहिजे. मी दोन ते तीन दिवसांनी एसटी आगारात स्वत: भेट देईल आणि त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा – वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स खाते हॅक, पोलिसांत तक्रार दाखल
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
एकनाथ शिंदे यांनी खोपट एसटी स्वच्छतागृहासह, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली. तसेच अधिकाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फिल्डवर उतरून काम केले पाहिजे आशा सूचनाही त्यांनी दिल्या.