उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी उल्हासनगर शहरात येणार आहेत. बुधवारी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले रुग्णालय, सिंधू भवन, विद्युत वाहने चार्जिंग स्थानक अशा विविध कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्र्यांच्या मार्गातील अडथळे हटवण्यासही पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
उल्हासनगर शहरातील अनेक दशके प्रलंबित असलेला अनधिकृत इमारतींच्या अधिकृत करण्याचा प्रश्न नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागला. सोबतच शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक परवानग्या देत अनेक सवलती राज्य सरकारकडून देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी आवश्यक विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून, त्यावरील सूचना हरकती सादर करण्याचे आवाहन केले जाते आहे. उल्हासनगर शहरातील रहिवाशांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. गेल्या अनेक दशकांत या मुद्द्यांवर अनेकांनी आश्वासन दिले होते. मात्र २००६ च्या अध्यादेशानंतर प्रथमच त्यात नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून बदल करण्यात आले. त्यामुळे शहरातील मोठा प्रश्न मार्गी लागला. या निर्णयानंतर बुधवारी पहिल्यांदाच उल्हासनगर शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत.
हेही वाचा – “संकल्पना, अपयश हेच उद्योजकतेमधील खरे भांडवल”; उद्योजक दीपक घैसास यांची माहिती
पालिकेने उभारलेले अद्ययावत रुग्णालय, प्रतिक्षित सिंधू भवन अशा महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण शिंदे करणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात स्वच्छ भारत अभियानातील वाहने, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्थानक, श्वान निर्बिजीकरण केंद्र आणि खडेगोळवली येथील मलनिस्सारण केंद्राचा समावेश आहे. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित झाला असून त्यासाठी पालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मार्ग, कार्यक्रमाचे ठिकाण याची नुकतीच अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या नियोजीत मार्गातील अडथळे हटवण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
हेही वाचा – बदलापूरमधील रासायनिक कंपनीला आग; तीन जखमी
शिंदे गटाचीही जय्यत तयारी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर सर्वप्रथम विरोध याच उल्हासनगर शहरात पहायला मिळाला होता. त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी मोडतोड केली होती. त्यातील बहुतांश शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. पालिकेच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. त्यामुळे, शहरासाठी घेतलेल्या पुनर्विकासाच्या निर्णयासह इतर प्रकल्पांच्या प्रसिद्धीतून निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.