ठाणेकरांसाठी गुरूवारनंतर पार्क खुले होणार

ठाणे : महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कोलशेत परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी केली आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची ३५०० फुल-फळ झाडे असून या वनराईतून वर्षाला ८८४ हजार लाख पौंड ऑक्सीजनची निर्मिती होणार आहे. या पार्कचे उद्घाटन येत्या गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते ठाणेकरांसाठी खुले होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरात पालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भुखंड उपलब्ध झाला होता. या भुखंडावर ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कल्पतरु विकासकाकडून ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ विकसित केले आहे. या पार्कचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे पार्क उपयुक्त ठरणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. सुविधा भुखंडावरील पूर्वीची झाडे, वृक्ष यांना धक्का न बसवता त्यांचाही वापर पार्कमध्ये करून हे उदयान फुलवण्यात आले आहे. एका पुरातन वटवृक्षाच्या सावलीत उभारलेले ट्री गार्डन तर बच्चे कंपनीसाठी खेळण्याची आवडीचे ठिकाण असेल. विविध प्रकारची ३५०० हून अधिक रोपे, फुल झाडे या पार्कमध्ये आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा >>> बंदुकीचे सर्वाधिक परवाने ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी ?

काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जेष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. येथे असलेल्या पाणवठ्यावर अनेक पक्षी येतात. त्यांचा किलबिलाट एकताना मनावरील शीण सहज दूर होईल. एक मोठे ओपन एम्पीथिएटर येथे आहे. यामुळे नैसर्गिक वातावरणात नागरिकांचे मनोरंजन होऊ शकेल. पार्कमध्ये कॅफेटेरीया, शौचालयाची सोय करण्यात आली आहे. भविष्यात येथे अनेक शाळांच्या सहली, पर्यावरणविषयक सहली आयोजित करता येऊ शकतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी २३५ झाडांवर कुऱ्हाड

न्यूयार्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हाईड पार्क आणि शिकागोच्या लिन्कॉलीन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारीत सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे. यामुले शहरात एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगलच उभे राहिलेले आहे. या पार्कमुळे ठाण्याच्या लौकिकात एक नवीन भर पडली असून त्याचबरोबर शहरात नवीन पर्यटन स्थळ उभे राहिले आहे. या पार्कचे उद्घाटन येत्या गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते ठाणेकरांसाठी खुले होणार आहे.

संदिप माळवीअतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

उद्यानाची वैशिष्ट्ये

* ठाण्यातील २०.५ जागेवरील सर्वात मोठे उद्यान

* न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कच्या संकल्पनेतून सेंट्रल पार्कची उभारणी

* पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्त प्रजातींचे आढळून येणार

* सर्वात मोठी खुली आणि हिरवीगार जागा * आकर्षणांमध्ये एक ट्रीहाऊस, ३-एकरांचे विस्तीर्ण तलाव आणि भारतातील सर्वात मोठ्या स्केटिंग पार्क या सर्वांचा उद्यानात समावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde will inaugurate grand central park in kolshet area built by thane municipal corporation zws
Show comments