ठाणे : भारतात २०२६ मध्ये ऑलम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पोलिस दलातील खे‌ळाडूंचाही सहभाग असायला हवा. यासाठी आतापासूनच मिशन ऑलम्पिक सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले. ठाणे शहरात आयोजित केलेल्या ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपस्थिती लावली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत एकूण १८ क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा झाल्या असून त्यात २ हजार ९२९ खेळाडूंनी सहभाग घेतला. पोलीस विभागातील खेळाडूंना ही एक चांगली संधी या माध्यमातून उपलब्ध झाली. यापुढेही जास्तीत जास्त पोलीस खेळाडूंनी अशा स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घ्यावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. महिला खेळाडूंचा लक्षणीय सहभाग असल्याचे सांगत त्यांचे फडणवीस यांनी महिला पोलिसांचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र देशात औद्योगिक दृष्ट्या क्रमांक एकवर येण्यातही पोलीस विभागाचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी “बेंचमार्क” म्हणून पाहिली जाते. ही ओळख कायम टिकविण्यासाठी पोलिसांनी अधिक जबाबदारीने अधिक पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. जशी खेळात संघभावना जोपासली जाते तशीच दैनंदिन कामकाजातही ही संघभावना जोपासायला हवी. पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश होण्यासाठी खेळातील कामगिरी त्या दर्जाची करावी. भारतात २०२६ मध्ये ऑलम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पोलिस दलातील खे‌ळाडूंचाही सहभाग असायला हवा. यासाठी आतापासूनच मिशन ऑलम्पिक सुरू करा, असे आदेश देत यासाठी शासन सर्व स्तरावर पाठीशी उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०२३ मध्ये झालेल्या या स्पर्धेत २५८८ खेळाडूंचा सहभाग होता, २०२४ मध्ये ३५०० आणि आता २९२९ खेळाडूंचा सहभाग आहे. ही संख्या कमी झाल्याबाबत खंत व्यक्त करत यापुढे ही संख्या अधिक कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत.अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केल्या.

Story img Loader