अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयातील ९० कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत, अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

– महापालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांना सेवा देताना अनेक अडथळे प्रशासनाला येत आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी ही रुग्णालये पालिकेला पूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हती. त्यामुळे रुग्णांना पूर्णवेळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी पालिकेने नऊ वर्षांपूर्वी सरकारकडे ९० वैद्यकीय पदांना मंजुरी देण्याची मागणी केली होती. नियमाप्रमाणे पालिकेचा आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असेल तर तेथील नोकरभरती रोखण्याचे अधिकार सरकारला आहेत.
– नऊ वर्षांपासून महापालिकेचा आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्याने सरकार या पदांना मंजुरी देत नव्हते. हिवाळी अधिवेशनात आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विधान परिषदेत पालिका रुग्णालयातील पदे मंजुरीचा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने पालिकेचा आस्थापनेवरील खर्च ४० टक्के असल्याने ही पदे मंजूर करता येणार नाहीत असे उत्तर देण्यात आले होते. चालू वर्षांत हा खर्च ३९.८० टक्के झाला आहे. नवीन पदे मंजूर केली तर त्यांच्या वार्षिक साडेतीन कोटी रुपये वेतनाचा भार महापालिकेवर पडणार आहे. हा भार उचलण्यासाठी पालिकेकडे महसुली उत्पन्नाचे नवीन स्रोत नाहीत. त्यामुळे ही रुग्णालये सरकारच्या ताब्यात घ्यावीत, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली होती. या विषयी पालिकेने दोन वेळा प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत, असे विधान परिषदेत शिंदे यांनी सांगितले होते. या घडामोडीनंतर चव्हाण यांनी प्रशासनाकडून एक अहवाल तयार करून घेतला होता. पालिका रुग्णालयांसाठी ९० पदे किती महत्त्वाची आहेत, हे नगरविकास विभागाला पटवून देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कडोंमपाच्या रुग्णालयांसाठी ९० पदे मंजूर करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

Story img Loader