कल्याण- मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसच्या डब्याला गुरुवारी दुपारी ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डब्याखाली इंजिन जवळ धूर येऊन अचानक आग लागली. काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रेल्वेचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा >>> बदलापूर : मुरबाडजवळ बिबट्याचा मृतदेह आढळला; नैसर्गिक मृत्यूची नोंद, कोरावळे गावाच्या हद्दीत सापडला मृत बिबट्या
डब्या खालून धूर येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी चालकाला एक्सप्रेस थांबविण्याची सूचना केली. रेल्वे कर्मचारी, आपत्कालीन पथकाने तात्काळ आग विझवली. आग वाढू नये म्हणून अग्निशमन दलाला कळविण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वीच आग विझविण्यात आली. डब्याखाली धूर आणि त्यानंतर आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी डब्यातून उतरणे पसंत केले. काही वेळ एक्सप्रेस या मार्गावर थांबविण्यात आली. आग विझविल्यानंतर १५ मिनिटात एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात नेण्यात आली. कल्याण मध्ये तंत्रज्ञांनी एक्सप्रेसची पूर्ण तपासणी केल्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी सोडण्यात आली. आगीत कोणतीही जीवित, वित्त हानी झाली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले