बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट नोंदवली गेली आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यात सर्वात कमी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बदलापुरात झाली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यातही पारा घसरलेला दिसून आला. त्यामुळे थंडीचा अनुभव नागरिकांना येत होता. सकाळी आणि रात्री चांगली थंडी जाणवत होती.
राज्यात सर्वत्र तापमानात घट पाहायला मिळते आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याची नोंद झाली आहे. त्यातच शनिवार हा मोसमातील सर्वाधिक थंड दिवस ठरला. जिल्ह्यात बदलापूर शहरात शनिवारी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. बदलापुरात सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्वात कमी अर्थात १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. यंदाच्या हिवाळ्यात आतापर्यंत हे सर्वात कमी तापमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याखालोखाल कर्जत शहरात १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा: बदलापूरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर; रिक्षा थांबा हटवल्याने चालकांचा संताप
पुढे जिल्ह्यात उल्हासनगर शहरात १५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. कल्याण शहरात १५.७ अंश सेल्सियस तर डोंबिवली श्रय १६.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. ठाणे शहरात १७.४ तर नवी मुंबईत १८ अंश तापमानाची नोंद झाली. तापमानात घट झाल्याने शनिवारी जवळपास सर्वच शहरात गारठा अनुभवास मिळाला.उत्तरेतून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात तापमानात घट होत असल्याचे खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले आहे. येत्या २,३ दिवसात असाच अनुभव येईल. पुढे तापमानात वाढ होईल असा अंदाजही मोडक यांनी व्यक्त केला आहे.