बदलापूरः फेंगल वादळामुळे गेल्या काही दिवस राज्यात तापमानात वाढ झाली होती. थंडीनंतर अचानक झालेल्या या तापमान वाढीमुळे अनेकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर रविवारपासून तापमानात पुन्हा घट होण्यास सुरुवात झाली. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. बदलापुरात ११.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर जिल्ह्यातील सरासरी तापमान आहे १२ अंश सेल्सियस इतके आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशावर फेंगल वादळाचे सावट होते. त्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटकाही बसला. तर मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यापूर्वी ठाण्यासह आसपासच्या भागात चांगली थंडी जाणवू लागली होती. मात्र ढगाळ वादळामुळे अचानक तापमान वाढल्याने अनेकांना त्याचा त्रास जाणवला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल होत असल्याचे दिसत होते.
रविवारी तापमानात चांगली घट पाहायला मिळाली. तर सोमवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात गारठा जाणवला. डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद सोमवारी झाली. सोमवारी जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान बदलापुरात नोंदवले गेले. बदलापुरात ११.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओखळले जाणारे माथेरान येथे ११.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे बदलापुरातही थंड हवेचे ठिकाण असल्याचा भास सोमवारी सकाळच्या सुमारास होत होता. जिल्ह्यातील सरासरी तापमान १२ अंश सेल्सियस इतके होते. उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभामुळे शिमला आणि इतर हिमालयच्या डोंगरात बर्फवृष्टी झाली. त्याच्या प्रभावामुळे आपल्या इथे उत्तरेकडून गार वारे वाहू लागले. परिणामी आर्द्रता कमी होऊन कोरडी हवा सुरू झाली. त्यामुळे तापमानात पटकन घट पाहायला मिळाली, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तापमानात घट होईल याचा अंदाज यापूर्वीच वर्तवला होता असेही मोडक म्हणाले आहेत. पुढच्या काही दिवसांतही असेच तापमान नोंदवले जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
शहरनिहाय तापमान
माथेरान ११.२
बदलापूर ११.३
अंबरनाथ १२.१
कल्याण १३.२
पनवेल १३.२
डोंबिवली १३.३
ठाणे १४
नवी मुंबई १४