ठाणे : संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कोल्ड प्ले’ या काॅन्सर्टची तिकीट दुप्पट ते तिप्पट चढ्या दराने विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. तिकीट विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, बेकायदेशीररित्या चढ्या दराने तिकीटाची विक्री होत असतानाही अनेकजण हे तिकीट खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसत आहे.
नवी मुंबई येथील डाॅ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये शनिवारी (आज), रविवारी आणि मंगळवारी ‘कोल्ड प्ले’चे आयोजन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोल्ड प्ले काॅन्सर्टच्या तिकीटांच्या काळा-बाजारा विषयी चर्चा रंगल्या होत्या. नवी मुंबईत हे काॅन्सर्ट असल्याने देशभरातील विविध भागातून तरुण-तरुणी तसेच विदेशी नागरिक नवी मुंबईत येऊ लागले आहेत. तिकीट विक्री पूर्ण झाली असल्याने अनेकांना इच्छा असूनही तिकीट मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे आता या तिकीटांची काही जण चढ्या दराने पुनर्विक्री करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापर करून या तिकीटांची विक्री केली जात आहे. तिकीटाच्या मागणीसाठी नागरिकांचे संदेश देखील त्यांना प्राप्त होत आहे. लाउंज या सर्वात महागड्या तिकीटाचा दर लाखाच्या घरात गेला होता. त्याची अधिकृत किंमत ३५ हजाराच्या आसपास होती. तर इतर ३ ते ४ हजार रुपयांच्या तिकीट पुनर्विक्री करण्यासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी केली जात होती. इतर आसन व्यवस्थांच्या तिकीटांबाबतीतही अशीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे, ही तिकीटे चढ्या दराने विक्री होत असतानाही ती खरेदी करण्यास तरुण-तरुणी तयारी दर्शवित असल्याचे चित्र होते.
नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे तिकीटाच्या काळा-बाजार बाबतची कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. तिकीटाचे काळा बाजार होत असल्याची तक्रार आल्यास कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल. – अमित काळे, उपायुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, नवी मुंबई पोलीस.