आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराटे स्पध्रेत सहभागी होण्यासाठी भाईंदरमधील बालक्रीडापटूंना सहकाऱ्यांची मदत

डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपलेले, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, एकटय़ा आईच्या कमाईवर चाललेला घराचा गाडा अशा परिस्थितीतही खेळाची आवड जपलेल्या शालेय विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. परंतु केवळ स्पर्धेसाठी येणारा खर्च न झेपणारा असल्याने स्पर्धेत सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहणार होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांला स्पर्धेला पाठवायचेच या जिद्दीने त्याच्या सहकाऱ्यांनीच पदरमोड करून वर्गणी जमा केली. याला स्थानिक नगरसेविका प्रभातताई पाटील यांनीही हातभार लावला त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही चित्तरकथा आहे मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधून शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक परिस्थितीने गांजलेले असतात. काशी गावातील मनपा शाळेत शिकणारा बीरू वर्मा हा विद्यार्थीदेखील याला अपवाद नाही. बीरूला वडील नाहीत, कारखान्यात काम करणाऱ्या आईच्या तुटपुंज्या पगारावर बीरू व त्याच्या तीन बहिणींचा उदरनिर्वाह चालतो. शिकण्याची इच्छा असलेल्या बीरूला खेळाचीही आवड आहे. कराटे या खेळाची त्याला विशेष गोडी लागली. बीरूला कराटेचे प्रशिक्षकही असेच नि:स्वार्थी व व्यासंगी लाभले. दिवसा रिक्षा चालवून सायंकाळी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कराटेचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या विनोद कदम यांच्या हाताखाली बीरू कराटेचे धडे गिरवू लागला व त्यात त्याने प्रावीण्यदेखील मिळवले. शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सिकाई मार्शल आर्ट या शालेय स्पर्धेत आधी जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत बाजी मारत त्याने राज्यस्तरावर धडक दिली आहे. २१ व २२ ऑक्टोबरला उस्मानाबाद येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी येणारा खर्च पाहून मात्र बीरूची द्विधा मन:स्थिती झाली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तब्बल पाच हजार रुपये खर्च येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची तर जबर इच्छा, परंतु तुटपुंज्या कमाईवर जेमतेम हातातोंडाची गाठ पडत असताना स्पर्धेचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न बीरूसह त्याच्या आईला छळू लागला. हीच परिस्थिती खासगी शाळेत दहाव्या इयत्तेत शिकत असलेल्या पूनम तमोली हिचा. तिच्याही घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच हजारांची रक्कम उभी कशी करायची, असा प्रश्न पूनमच्याही घरच्यांपुढे होताच.

बीरू व पूनमची ही घालमेल कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली. आपले सहकारी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत आहे याचा बीरू व पूनमच्या सहकाऱ्यांना विलक्षण अभिमान होताच, सर्वानी मिळून या आर्थिक चणचणीवर मात करायचे ठरवले. स्वत:ची झोळी फाटलेली असली तरी बीरूव पूनमला स्पर्धेला पाठवायचेच, असा चंग या विद्यार्थ्यांनी बांधला आणि आपसातच वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. कोणी २० रुपये तर कोणी ५० रुपये असे ज्याला जेवढे शक्य आहे, तेवढे पैसे जमा केले. परंतु त्यानंतरही आवश्यक ती रक्कम जमा झाली नाही. अखेर ही बाब निवृत्त शिक्षिका असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ  नगरसेविका प्रभातताई पाटील यांना समजली.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांना कौतुक वाटले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जमा केलेली रक्कम तशीच ठेवून बीरू व पूनम या दोघांचा संपूर्ण खर्च स्वत: करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colleagues help child sportspersons in bhayandar for karate championship