डोंबिवली: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून येथील श्री गणेश मंदिर संस्थान आणि इतर दोन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ५, ६ नोव्हेंबर रोजी एक हजार लीटर खाद्यतेल जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकलित खाद्यतेल निवासी शाळकरी विद्यार्थी गृह, वृध्दाश्रम यांना देण्यात येणार आहे.
श्री गणेश मंदिर संस्था, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या तीन धार्मिक, सामाजिक संस्थांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर संस्थानमध्ये दोन दिवस खाद्य तेल संकलन केले जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या इच्छेप्रमाणे बंदिस्त खाद्यतेल येत्या शनिवारी, रविवारी गणेश मंदिरात आणून द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. जमा होणारे खाद्य तेल डोंबिवली परिसरातील शाळकरी विद्यार्थी निवास करत असलेल्या शैक्षणिक संस्था आणि वृध्दाश्रम, समाजपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थाना देण्यात येणार आहे, असे रोटरी क्लब डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष शैलेश गुप्ते यांनी सांगितले.
श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, इनरव्हील क्लब डोंबिवली वेस्टच्या अध्यक्षा शुभांगी काळे आणि रोटरीचे अध्यक्ष गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे. जमा होणारे तेल योग्यरितीने जमा करणे आणि त्याचे वाटप नियोजन करण्यात आले आहे, असे व्यावसायिक श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितले. या उपक्रमानंतर सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गणेश मंदिरात दीपोत्सवाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते सात वेळेत होणार आहे.